Latest Marathi News
Ganesh J GIF

मोबाईल चार्जरची पिन तोंडात घातल्याने 8 महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

बंगळुरू: लहान मुलांकडे दुर्लक्ष करणे किती महागात पडू शकते याचा प्रत्यय बंगळुरूमध्ये आला आहे. स्विचबोर्ड सॉकेटला लावण्यात आलेल्या मोबाईल चार्जरची पिन तोंडात घातल्यामुळे एका चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे.

ही दुर्दैवी घटना बुधवारी कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार तालुक्यातील सिद्दराडा गावामध्ये घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे चिमुकलीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडले नेमके?

संतोष कलगुटकर आणि संजना कलगुटकर यांची लेक सान्निध्या घरात खेळत होती. त्यावेळी ती स्विचबोर्डजवळ गेली. त्यावेळी स्विचबोर्डला मोबाईल चार्जर लावलेला होता. चार्जरला मोबाईल लावण्यात आलेला नव्हता. पण बटण बंद करण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे चार्जरमध्ये वीज प्रवाह होता. सान्निध्यानं मोबाईल चार्जरची वायर हातात घेतली. तिनं वायर तोंडात घातली आणि ती पिन चावू लागली. त्यामुळे तिला शॉक लागला. मोबाईल चार्जर स्विच बोर्डला लावून बटण बंद न केल्याची चूक सान्निध्याच्या आईकडून घडली आणि ती सान्निध्याच्या जीवावर बेतली.

काही वेळाने आईचं सान्निध्याकडे लक्ष गेलं. ती स्विचबोर्डजवळ पडली होती. यानंतर तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यामुळे कलगुटकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सान्निध्याचे वडील संतोष कलगुटकर हुबळी इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनीत (हेस्कॉम) कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करतात. ही दुर्दैवी घटना घडली तेव्हा ते कार्यालयात होते. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!