मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात तणावाचं वातावरण..! शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने, नेमके प्रकरण काय ?
आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने अनेक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीवर भर दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोपरी पाचपाखाडीतही राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
या कोपरी पाचपाखाडीत शिवसेनेच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं.आज सोमवारी प्रचाराची सांगता असल्याने ठाण्यातील कोपर पाचपाखाडी मतदारसंघातील युतीचे उमेदवार एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे यांचे कार्यकर्ते अष्टविनायक चौक या ठिकाणी एकमेकांच्या समोर आले. त्यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं.
प्रचाराचाला काही तास शिल्लक राहिले असताना कोपरी पाचपाखाडीत शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून मोटार सायकल रॅली काढण्यात आली. ठाण्याच्या कोपरी परिसरातील अष्टविनायक चौक या ठिकाणी ही रॅली काढली. या वेळेस शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले. त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने परिसरातील राजकीय वातावरण काही काळ तापल्याच पहायला मिळाल.