कसिनोमधील फोटो व्हायरल करून बदनामीचा प्रयत्न
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप, म्हणाले 'आमची ३४ वर्षाची सामाजिक इमेज....
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- कुटुंबासोबत सुट्यांवर असताना एका चुकीच्या पद्धतीने काढलेला फोटो व्हायरल करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. दिवाळीच्या सुट्यांमध्ये ते कुटुंबासह हांगकॉंगच्या ट्रीपवर गेले होते.
मुंबई येथे ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात गेल्या ३४ वर्षांपासून आहे. भाजप-शिवसेनेच्या युतीत अनेक वर्षे काम केले. शिवसेनेतील लोक मला ओळखतात. विधीमंडळात २० वर्षांपासून आमचे अनेक मित्र आहे. मंत्री म्हणून काम केलं आहे. मतदारसंघात आम्ही ४-४ वेळा निवडून आलो आहोत, अशा कुठल्या फोटोच्या आधारावर इमेज खराब करता येत नाही. मोठ्या प्रमाणावर संघर्ष करून ३४ वर्षे ही इमेज तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. पण ज्यांनी कुणी असा प्रयत्न केला असेल त्यांना त्यांचा प्रयत्न लखलाभ असावा. भाजपा प्रदेशाध्यक्ष पदावर कार्य सुरु केल्यापासून आठवड्यातून किंवा महिन्यातून मी घरी जातो. त्यामुळे माझ्या सुनेने व मुलीने तीन दिवसांचा सहकुटुंब पर्यटनासाठी जाण्याचा प्लॅन केला. हाँगकाँग, मकाऊ या पर्यटन स्थळावर आम्ही गेलो. अत्यंत चांगल चालू असताना व्यक्तिगत जीवनात ज्या पद्धतीने आमच्या परिवाराला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न झाला. अशा राजकारणाच दु:ख झाले. अशा पद्धतीचे प्रयत्नही चुकीचे वाटले. मला आणि परिवाराला वाईट वाटले, आपण हाँगकाँगला परिवारासोबत गेलो होतो, पण त्या ठिकाणी प्रत्येक हॉटेलमध्ये कसिनो असतो, त्याला क्रॉस करून जाताना कुणीतरी तो फोटो काढल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मकाऊमधील एक फोटो ट्विट केला होता. या फोटोमधून कसिनो खेळत बावनकुळेंनी साडेतीन कोटी रूपये जुगारात उडवल्याचा दावा केला होता.