बीसीसीआयचा वार्षिक करार जाहीर! कुणाला बढती, कुणाला झटका?
बीसीसीआयचे 'हे' खेळाडू मालामाल तर या खेळाडूंना जोरदार दणका, पहा यादी
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने २०२२-२३ साठीच्या हंगामासाठी टीम इंडियाने वार्षिक खेळाडू करार जाहीर केला आहे. या नव्या करारात २६ खेळाडूंना स्थान मिळाले. यामधील काही खेळाडूंना बढती मिळाली असुन काहींचे डिमोशन झाले आहे. याव्यतिरिक्त काही खेळाडूंना या करारात स्थान देखील मिळाले नाही.
बीसीसीआयच्या या केंद्रीय करारात आपल्या दमदार कामगिरीचे बक्षीस रवींद्र जडेजाला मिळाले आहे. जडेजाचा A+ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. तर हार्दिक पांड्यालाही बढती देण्यात आली आहे. दुखापतीमुळे बरेच दिवस असलेल्या जयप्रीत बुमराह याला मात्र ए प्लस श्रेणीत कायम ठेवण्यात आले आहे. सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल C श्रेणीतून B श्रेणीमध्ये आले आहेत. बीसीसीआयच्या करारात काही खेळाडूंना नुकसान झाले आहे. के. एल राहुल ए कॅटेगरीमधून बी कॅटेगरीत करारबद्ध झाला. तर शार्दुल ठाकूरला बी मधून सी मध्ये डिमोट करण्यात आले आहे. पण त्याचबरोबर अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, रिद्धिमान साहा, मयांक अग्रवाल यांना मध्यवर्ती करारामधून वगळण्यात आले आहे.
बीसीसीआयने प्रसिद्ध केलेली यादी
ए प्लस श्रेणी – रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.
ए श्रेणी – हार्दिक पांड्या, आर. अश्विन, मोहम्मद शमी, रिषभ पंत, अक्षर पटेल.
बी श्रेणी – चेतेश्वर पुजारा, के. एल राहुल. श्रेयस अय्यर. मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल.
सी श्रेणी – उमेश यादव, शिखर धवन, शार्दुल ठाकूर, इशान किशन, दीपक हुडा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, के.एस. भारत.
बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये वेगवेगळ्या श्रेणींमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना वेगवेगळी वार्षिक रक्कम दिली जाते. A+ श्रेणीतील खेळाडूंना सर्वाधिक फी मिळते. या श्रेणीत बीसीसीआयकडून खेळाडूंना ७ कोटी रुपये दिले जातात. A श्रेणीतील खेळाडूंना ५ कोटी तर B श्रेणीतील खेळाडूंना ३ कोटी मिळतात. तर C श्रेणीतील खेळाडूला १ कोटी दिले जातात.