संगम माहुली (ता. सातारा) येथील युवा नेते संतोष जाधव यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. ही घटना मंगळवारी (ता. ६) रात्री उशिरा घडली आहे. यात दोन जणांनी जाधव यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये जाधव गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, संतोष जाधव यांची दोघेजण पूर्वीच्या वादातून माफी मागायला म्हणून आले होते. यावेळी आरोपींनी जाधव यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये जाधव यांच्या डोक्याला जखम झाली आहे. नागरिकांनी जाधव यांना तातडीने येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले
दरम्यान, या घटनेनंतर पोलीस अधीक्षक यांनी तातडीने संशयितांना पकडण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत. त्यानंतर पोलिसांनी माहुली परिसरातून काही मिनिटांतच दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलीस त्यांच्याकडे कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, हल्ल्यामागील कारण स्पष्ट झाले नाही. सातारा शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झालेली नव्हती.