इंदोर – मध्य प्रदेशात इंदोर इथं २ महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यात आई वडिलांनी लपून मुलाचा मृतदेह दफन करण्याची तयारी केली. परंतु याची माहिती पोलिसांना मिळाली.
तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी आई वडिलांसह कुटुंबाची चौकशी करत मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. हा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला. आई वडिलांच्यामध्ये झोपलेला चिमुरड्याचा गुदमरुन मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. परंतु मृत्यूचे खरे कारण पोस्टमोर्टम रिपोर्ट आल्यानंतरच समोर येईल.
चिमुरड्याच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण खजराना गावातील झल्ला कॉलनीतील आहे. याठिकाणी राहणाऱ्या तौफिकच्या २ महिन्याच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबाने कुणालाही न कळवता लपवून मुलाला दफन करण्याची तयारी केली. परंतु या घटनेची माहिती कुणीतरी पोलिसांना फोन करून कळवली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी पाठवला. पोलिसांच्या चौकशीत तौफिकने सांगितले की, मंगळवारी सकाळी पत्नी मुलगा अर्सलानला दूध पाजत होती त्यानंतर त्याला पलंगावर झोपवले. परंतु काही वेळाने अर्सलानला पाहिले तेव्हा त्याच्या नाकातून रक्त वाहत होते.
तौफीक पुढे म्हणाला की, यानंतर आम्ही मुलाला घेऊन हॉस्पिटलला पोहचलो त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासले असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर आम्ही मृतदेह घेऊन परत आलो आणि मुलाला दफन करण्याची तयारी सुरू केली. खजराना ठाण्याचे पोलीस निरिक्षक एन एस बोरकर म्हणाले की, मुलाच्या मृत्यूची बातमी समजली. त्यानंतर टीमने संबंधित कुटुंबाकडे चौकशी केली. ते लोक मुलाचा मृतदेह दफन करण्याची तयारी करत होते. मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी पाठवला आहे. प्रथम दर्शनी मुलाचा गुदमरून मृत्यू झाल्याचे दिसते परंतु मृत्यूचे खरे कारण पोस्टमोर्टम रिपोर्ट आल्यावर समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.