सिक्युरिटी केबीनमध्ये साफसफाईची बॅग ठेवण्यावरुन वाद ;सुरक्षा रक्षकाने लोखंडी रॉडने केला तरुणावर जीवघेणा हल्ला, आरोपीवर गुन्हा दाखल
चारचाकी गाड्यांची साफसफाई करण्यासाठी लागणार्या साहित्याच्या बॅग सिक्युरिटी केबीनमध्ये ठेवण्यावरुन व पिण्याचे बाटलीतील पाणी पिण्यावरुन झालेल्या वादात सुरक्षा रक्षकाने लोखंडी रॉडने मारहाण करुन तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
याबाबत विशाल नवनाथ गायकवाड (वय ३३) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी घनसिंग रावत या सुरक्षारक्षकावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार भोसरीतील इंद्रायणीनगरमधील साई रेसिडेन्सी सोसायटीत बुधवारी सकाळी साडेआठ वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साई रेसिडेन्सी या सोसायटीमधील सदस्यांच्या पार्क केलेल्या चार चाकी गाड्या धुण्याचे काम विशाल गायकवाड करतात. गाड्या धुण्यासाठी साफसफाई करण्यासाठी लागणार्या साहित्याची बॅग ते सिक्युरिटी केबीनमध्ये ठेवून गाड्या धुवत असतात.
नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी बॅग केबीनमध्ये ठेवून ते गाड्या धुवत होते. यावेळी सुरक्षारक्षक घनसिंग रावत हा त्यांच्याजवळ आला. तू तुझी बॅग सिक्युरिटी केबीनमध्ये ठेवायची नाही, असे शिंदे साहेबांनी सांगितले. तसेच माझ्या पाणी पिण्याच्या बाटलीमधील पाणी प्यायचे नाही, असे रावत याने त्याला सांगितले. त्यावर त्यांच्यात वाद झाला. तेव्हा रावत याने शिवीगाळ करुन तुझा जीवच घेतो, असे म्हणून जमिनीवर पडलेला लोखंडी रॉड उचलून फिर्यादीच्या कपाळावर, डाव्या हातावर, छातीवर मारुन गंभीर जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक महाडिक तपास करीत आहेत.