
दोनदा डीएड फेल होणारा ‘मनोहर’ बाळूमामांचा अवतार कसा झाला? वाचा, एका भोंदूच्या काळ्या साम्राज्याचा कच्चा चिट्ठा!
काळी जादू, लैंगिक शोषणासह फसवणुकीचे गंभीर गुन्हे असलेल्या भोंदू मनोहर मामा भोसले याला चौकशीसाठी कुर्डूवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने शुक्रवारी ( २४ एप्रिल ) दुपारी पुण्यात मांजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पुन्हा अटक केली.त्यानंतर पुन्हा एकदा मनोहर भोसले उर्फ मनोहर बाबा चर्चेत आला आहे. ‘बाळू मामा’चा अवतार असल्याची बतावणी करणाऱ्याची कुंडली समोर आली आहे.’मी संत बाळूमामाचा अवतार’ असल्याचे सांगून कर्करोग बरा करतो असा दावाच मनोहर मामा करत असे. मनोहर भोसले बाभळीचा पाला, साखर, भंडारा विकत घ्यायला लावायचा. २०२१ मध्ये शशिकांत खरात यांची २ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर भोसलेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर मनोहर भोसलेने आश्रमात साथीदारांसह लैंगिक शोषण केल्याचा आरोप महिलेने केला होता. त्याही प्रकरणात भोसलेला २०२१ मध्ये अटक झाली होती.बाळूमामांचा अवतार असल्याची बतावणी, सगळ्यांनाच जाळ्यात ओढलं.

‘बाळूमामांचा अवतार’ म्हणवून घेत सर्वसामान्यांपासून बड्या राजकारण्यांपर्यंत सर्वांनाच जाळ्यात ओढणाऱ्या मनोहर भोसले उर्फ मनोहर मामाचा काळा इतिहास आता समोर आला आहे. एकेकाळी शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणारा हा तरुण दोनदा डीएड परीक्षेत नापास झाला आणि तिथूनच त्याच्या भोंदूपणाचे शिक्षण सुरू झाल्याचे म्हणतात. फसवणूक आणि जादूटोणा प्रकरणी पुन्हा एकदा गजाआड गेलेल्या मनोहर मामाचा घोटी (ता. करमाळा) येथील २७ एकरांतील आलिशान आश्रम कायमचा बंद करण्यासाठी ग्रामस्थ आता एकवटले आहेत.शिक्षक होण्यात अपयश, मग जादूटोण्याचा मार्गइंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावचा मनोहर भोसले शिक्षक होण्यासाठी डीएड करत होता. मात्र, सलग दोन वेळा नापास झाला. मात्र, या अपयशानंतर पुन्हा प्रयत्न न करता त्याने आपली दुसरी वाट निवडली. मनोहरने थेट पश्चिम बंगाल गाठलं आणि तिथे जादूटोणा शिकला असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. त्यानंतर उंदरगाव (ता. करमाळा) येथे नातेवाईकांकडे राहू लागलेल्या मनोहरने लोकांना मोहिनी घालण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याचे नाव मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांपर्यंत पोहोचले आणि एका झोपडीत राहणारा मनोहर भोसले आलिशान आश्रमाचा मालक बनला.
अवताराचा बनाव लोकांचं भविष्य अन् आलिशान कारची गर्दी.

मनोहर भोसले हा लोकांची भाकित सांगायचा. मात्र, त्याचा अधिक कल हा लोकांचा भूतकाळ सांगण्याकडे अधिकच असायचा. यातून लोकांवर तो आपल्या ‘ दिव्य शक्ती’ची भुरळ पाडायचा. मनोहर मामाचं नाव चांगलच गाजू लागल्यावर उंदरगावच्या आश्रमात अमावस्या-पौर्णिमेला बड्या नेत्यांच्या आणि सेलिब्रिटींच्या कोट्यवधींच्या गाड्यांची गर्दी होऊ लागली. भक्तांनी त्याला ‘साक्षात बाळूमामांचा अवतार’ अशी प्रतिमा मिळवून दिली. मात्र, २०२१ मध्ये लैंगिक शोषण आणि कॅन्सर बरा करण्याच्या नावाखाली बाभळीचा पाला अन् भंडारा देऊन अडीच लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल झाले. यामुळे त्याला उंदरगावचा आश्रम बंद करावा लागला.घोटीमधील २७ एकरांचे साम्राज्य धोक्यात? उंदरगाव सोडल्यानंतर मनोहरने करमाळ्यातील घोटी येथे २७ एकर जमीन खरेदी केली. आलिशान आश्रम आणि फळबागा उभारल्या. राजकीय संबंध वापरून ग्रामस्थांवर दडपण आणण्याचा प्रयत्नही त्याने केल्याचे म्हटले गेले. त्याच्या या दडपणाला गावचे सरपंच विलास राऊत आणि ग्रामस्थ डगमगले नाहीत. आता पुन्हा एकदा फसवणुकीच्या गुन्ह्यात मनोहर मामा अटकेत गेल्यानंतर घोटी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या आश्रमाची सखोल चौकशी करून तो तातडीने बंद करावा, अशी लेखी मागणी सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे करण्यात आली आहे.


