बीड दि ५ (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यात बंदुकीचा धाक दाखवत ८ ते १० दरोडेखोरांनी ९ लाखांची रोख रक्कम आणि ५ तोळे सोने लुटल्याची घटना समोर आली आहे. दरोडेखोरांची धाडसी दरोडा घातल्याने पोलिसांचा धाक उरलाय का? असा प्रश्न या घटनेच्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. दरोडेखोरांनी चोरी करताना दाम्पत्यास बेदम मारहाण केली आहे. या घटनेतील आरोपी सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले आहेत.
बीडच्या वडवाडी गावात बंदुकीचा धाक दाखवून ८ ते १० जणांनी सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचे प्रमुख अभिमान अवचर यांचे कार्यालय आणि घरी धाडसी दरोडा टाकून पती-पत्नीला बेदम मारहाण करत ९ लाख रुपये रोख आणि ५ तोळे सोने चोरून नेले आहे. ही घटना काल मध्यरात्रीच्या दरम्यान घडली आहे. या घटनेने वडवाडीच्या बालाघाट परिसरात एकच खळबळ उडाली. संबंधित घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांसह एलसीबीच्या अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या दरोड्याप्रकरणी बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.