छापखान्यातून पावडरच्या तब्बल ८८ हजार कोटी मूल्यांच्या नोटा गायब
नाशिक, देवास, बेंगलोरमधून नोटा गायब, माहिती अधिकारातून मोठा खुलासा, विरोधक आक्रमक
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- देशातील देवास नाशिक, बंगलोर येथील नोटांच्या छापखान्यामधून पाचशे रुपयांच्या १ हजार ७६१ दशलक्ष नोटा गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. माहिती अधिकारात मनोरंजन रॉय यांना ही माहिती मिळाली आहे.
देवास नाशिक आणि बंगलोर येथील छापखान्यांमध्ये छापण्यात आलेल्या या नोटा रिझर्व बँकेत पोहोचण्यापूर्वीच गायब झाल्या आहेत. या नोटा छापखान्यातून रिझर्व बँकेकडे रवाना झाल्या. मात्र, त्या कधीच रिझर्व बँकेत पोहोचल्या नाहीत अशी माहिती आता माहिती अधिकारात समोर आली आहे. नाशिक करन्सी नोट प्रेसद्वारे ३७५.४५० दशलक्ष नवीन डिझाईनच्या ५०० रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या होत्या, परंतु एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत छापण्यात आलेल्या रिझर्व्ह बँकेच्या नोंदींमध्ये केवळ ३४५.००० दशलक्ष नोटाच सापडल्या आहेत. गायब नोटांची किंमत ८८,०३२.५ कोटी रुपये आहे. दरम्यान आतापर्यंत गेल्या चार वर्षात आयकर विभाग आणि सक्तवसुली संचालनालयाने अनेक ठिकाणी छापे मारले आहेत. या छाप्यांमध्ये पाचशे रुपयांच्या कोट्यावधी किमतीच्या नोटा सापडल्या आहेत. यामुळे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल आणि तिच्या स्थिरतेबद्दल सुरक्षेची चिंता निर्माण होते, असे राॅय म्हणाले आहेत.
इतक्या मोठ्या प्रमाणात जर नोटा चलनामध्ये असतील तर त्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारला कशी माहिती नाही. केंद्रीय तपास यंत्रणा याबाबत का सजग नाहीत असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. करन्सी नोट प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी मात्र हे गैरसमजातून घडल्याचे सांगितले आहे.