
मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात बड्या घोषणांचा पाऊस पाडण्यात आला.यात बिहारसाठी 26 हजार कोटी तर आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच मिळालेले नाही. यावरून शिवसेना ठाकरे गटाने केंद्र सरकारला थेट इशारा दिला आहे.या अर्थसंकल्पात 9 घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यात शेती क्षेत्रातील उत्पादकता, रोजगार व कौशल्य विकास, मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय, उत्पादन व सेवा, शहरी विकास, उर्जा संरक्षण, पायाभूत संरचना, संशोधन व विकास, नव्या पीढीतील सुधारणा आदींचा समावेश आहे. तर एकीकडे बिहार आणि आंध्र प्रदेशला घवघवीत निधी देण्यात आला आहे. तर महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच आले नसल्याने ठाकरे गटाने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले की, अर्थसंकल्प पाहिला तर महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही, असे म्हणायला वाव आहे. शेतकऱ्यांना देखील या अर्थसंकल्पातून काहीच मिळालं नाही. आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्यांना जास्त फायदा झालेला दिसतोय. एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा आधी होता, त्यामुळं त्यांना काहीच दिले नाही असे वाटते. ज्यांच्यामुळे सरकार आहे, त्यांना जास्त लक्ष दिल्याचे दिसून येतंय. महाराष्ट्राला सर्वच बाबतीत अपेक्षा होत्या. याचा परिणाम पुढील विधानसभा निवडणुकीत दिसेल, असा इशारा त्यांनी यावेळी मोदी सरकारला दिला आहे.चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील टीडीपी सरकारकडून अमरावतीला आंध्र प्रदेशची राजधानी बनवायची आणि विकसित करायची आहे, त्यासाठी त्यांना १५ हजार कोटी रुपये देण्यात यावेत, अशी मागणी सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आंध्र प्रदेशच्या नवीन राजधानीसाठी 15 हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे.
अर्थमंत्री सीतारामन यांनी नितीश कुमार मुख्यमंत्री असलेल्या बिहारला मोठं गिफ्ट दिले आहे. बिहारच्या बोधगयामध्ये औद्योगिक विकासाला चालना देऊ, असे त्यांनी सांगितल्याने पूर्व विभागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. तसेच रस्ते जोडणी प्रकल्पांच्या विकासातही सहकार्य करू. पाटणा-पूर्णिया द्रुतगती मार्ग, बक्सर-भागलपूर महामार्ग, बोधगया-राजगीर-वैशाली-दरभंगा आणि बक्सरमध्ये गंगा नदीवर अतिरिक्त द्विपदरी पूल 26 हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे. बिहारमध्ये नवीन विमानतळ, वैद्यकीय सुविधा आणि क्रीडा, पायाभूत सुविधांसह महामार्गांसाठी 26 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.