भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलिया ठरला कसोटी चॅम्पियनशीपचा विजेता
भारताचा २०९ धावांनी केला पराभव, सलग दुसऱ्यांदा भारताचे स्वप्न अपुरे, विजेतेपदाचा दुष्काळ
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने टीम इंडियाचा पराभव करत कसोटी चॅम्पियनशीपची गदा पटकावली आहे. त्यामुळे सलग दुस-यांदा भारताला विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. ऐतिहासिक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा २०९ धावांनी पराभव केला आणि टेस्ट क्रिकेटची चॅम्पियनशीप पटकावली आहे.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने भारताला ४४३ धावांचे आव्हान दिले होते. पण भारताचा संपूर्ण संघ २३४ धावात बाद झाला. टॉस जिंकून कॅप्टन रोहित शर्माने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने चिवट फलंदाजी करत ४६९ धावा केल्या होत्या. पण धावांचा पाठलाग करताना भारताचा संघाला केवळ २९६ धावा करता आल्या. त्यामुळे पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाने १७३ धावांची मजबूत आघाडी घेतली होती. सामन्यात पूर्ण वेळ ऑस्ट्रेलियानेच वर्चस्व ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २७० धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने पहिल्या डावात २९६ धावा आणि दुसऱ्या डावात २३४ धावा केल्या. या सामन्यासाठी ट्रॅव्हिस हेडला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब देण्यात आला आहे. याआधीही भारत न्यूझीलंड कडून पराभूत झाला होता. आता पुन्हा एकदा भारत टेस्ट चॅम्पियनशीप विजेते पदापासून दुर राहिला आहे.
भारताने २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला होता. मात्र त्यानंतर १० वर्षात भारताला एकदाही आयसीसी जेतेपद पटकावता आलेलं नाही. आयसीसीच्या ९ स्पर्धांमध्ये भारतीय संघ विजेतेपदाच्या प्रतीक्षेतच राहिला आहे. विराट नंतर रोहित देखील विजेतपदापासुन अद्याप तरी दुरच आहे.