निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारींना ‘महाराष्ट्र भूषण’ प्रदान
एकाच घरात दोघांचा सन्मान, सोहळ्यासाठी उसळला श्री भक्तांचा जनसागर
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबईतील खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी शाल मानपत्र, २५ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह देत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी लाखो लोकांचा जनसागर उसळला होता. श्रीरामाची प्रतिमा देऊन डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते डॉ. अाप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. बैठक चळवळीचे प्रणेते दिवंगत महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी यांनी दासबोधाच्या निरूपणातून समाजमनात आमूलाग्र बदल केले आहेत. समाजातील अंधव्यवस्थेवर दासबोधी विचारांच्या माध्यमातून जनजागृती करत समाजाला सकारात्मक वाटेवर घेऊन जाण्याचे काम या चळवळीतून झाले आहे. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्माधिकारी यांच्या कार्याचा गाैरव केला. पुरस्काराला उत्तर देताना मिळालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारचे श्रेय हे आपल्या सर्वांना जात असल्याचे मत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. एका घरात दोन वेळा पुरस्कार दिला जातो अशी घटना कुठेही झाली नसल्याचे धर्माधिकारी म्हणाले आहेत. माझ्यानंतर सचिन धर्माधिकारी सुद्धा चांगले काम करेन असे धर्माधिकारी म्हणाले. काम उत्तम असेल तर सन्मान होतोच असे धर्माधिकारी यावेळी म्हणाले. दरम्यान निरूपणकार कै. नानासाहेब धर्माधिकारी यांचे चिरंजीव असलेल्या अप्पासाहेब यांना वडिलांकडूनच निरूपणाचं बाळकडू मिळालं. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना याआधी पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.
विशेष म्हणजे नानासाहेब धर्माधिकारी यांनाही महाराष्ट्र भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने २०१५ ते २०२१ या काळात ३६ लाखांहून अधिक वृक्ष लागवड करण्यात आली. या वृक्षांची जोपासना श्री सदस्यांकडून होतेय. याशिवाय अनेक ठिकाणी स्वच्छता मोहिमसुद्धा राबवली जात असते.