बार्शीचे आमदार राऊत यांच्या संपत्तीची होणार चौकशी
भाऊसाहेब आंधळकरांच्या मागणीला यश, भाजप समर्थक आमदारामागे ईडीचा फास?
बार्शी दि २८(प्रतिनिधी)- बार्शीचे भाजप समर्थक अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी ज्ञात स्त्रोतापेक्षा जादा बेहिशेबी मालमत्ता जमा केली आहे. त्याची चौकशी करून कारवाई करावी अशी तक्रार निवृत्त पोलिस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर केली होती. उच्च न्यायालयाने त्यांची मागणी मान्य करत राजेंद्र राऊत यांच्या संपत्तीच्या चाैकशीचे आदेश दिले आहेत.

बाळासाहेंबाची शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, प्राप्तीकर विभाग, केंद्रीय अन्वेषण विभाग,ईडीकडे आमदार राजेंद्र राऊत यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. पण त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने आंधळकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या याचिकेवर १७ जानेवारीला सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या धिम्या गतीने होत असलेल्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करत माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २३ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक यांनी तीन महिन्यात आंधळकर यांच्या तक्रारीबाबत कार्यवाही करण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र न्यायालयासमोर सादर केले आहे.हा राजेंद्र राऊत यांच्यासाठी मोठा धक्का आहे. राज्यात जरी भाजप आणि शिंदे गटात युती असली तरी बार्शीतील राजकारण मात्र व्यक्तीकेंद्रीत राहिलेले आहे. पण राऊत यांना या निर्णयामुळे बार्शी नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूकीत अडचण होण्याची शक्यता आहे.
आमदार राऊत यांच्या ज्ञात स्त्रोतापेक्षा बेहिशोबी मालमत्तेची लाचलुचपत विभागाने सुरू केलेली चौकशी ही न्यायालयाने आदेश दिल्याने सुरू झाली आहे, त्यामुळे न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे; अन्यथा ही चौकशी कधी होणार होती की होणारच नव्हती, याबाबत स्पष्टता नव्हती, असे शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी सांगितले आहे.