जेष्ठ लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण काळाच्या पडद्याआड
साठ वर्षांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य,हळहळ व्यक्त
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- अनेक चित्रपटांमधून आपल्या गायनाने वेड लावणाऱ्या लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन झाले आहे. त्यांचा मुलगा विजय चव्हाण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. त्या ९२ वर्षांच्या होत्या. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
लावणी आणि सुलोचना ताईंचे वेगळेच नाते होते. मराठी चित्रपटसृष्टीत ठसकेबाज लावणी गात त्यांनी एक वेगळीच भूरळ श्रोत्यांना घातली होती. त्यांच्या सर्वच लावण्या गाजल्या पण तुझ्या उसाला लागल कोल्हा ही लावणी विशेष गाजली. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पार्थिवावर वाजता आज ३ वाजता मरीन लाईन्सच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. तब्बल ६० वर्षांहून अधिक काळ मराठी रसिक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुलोचना चव्हाण यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून खालावलेली होती.
भारत सरकारने त्यांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मश्री’ या नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. सुलोचना चव्हाण यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातला बुलंद आवाज हरपला आहे. सोळावं वरीस धोक्याचं, उसाला लागलं कोल्हा, पाडाला पिकलाय आंबा, पावणा पुण्याचा आलाय गं, अशा शेकडो लावण्या त्यांनी अजरामर केल्या आहेत.