Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात नगररोड क्षेत्रीय कार्यालया बाहेर “भीक मांगो” आंदोलन

पावसाळी स्टॉर्म वॉटर लाईन टाकण्यात अपयशी ठरलेल्या मनपा प्रशासनाचा निषेध, आप आक्रमक

पुणे दि २३(प्रतिनिधी)- आम आदमी पार्टीकडून “भीक मांगो” आंदोलन करण्यात आले. खराडी मधील ‘आपले घर’ परीसरात पावसाळी स्टॉर्म वॉटर पाईपलाईन नसल्याने परिसरातील नागरिकांच्या घरात दर वर्षी पाच फूट पाणी शिरते. त्यामुळे अनेक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. गेल्या १० वर्षात क्षेत्रीय कार्यालयाशी अनेक वेळा नागरिकांनी पत्रव्यवहार करून देखील कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही. अनेक वेळा पाठपुरावा करून निधी उपलब्ध नाही, असे मोघम उत्तर येण्यात येत होते. याच्या विरोधात आज आम आदमी पार्टी कडून “भीक मांगो” आंदोलन करण्यात आले.

आपचे खराडी प्रभाग अध्यक्ष तानाजी शेरखाने व सुनिता शेरखाने यांच्या पुढाकाराने झालेल्या या आंदोलनात स्थानिक नागरिक, महिला व आप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपचे राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी आपले घर परिसरात अद्यापही पावसाळी पाईपलाईन न टाकल्याने संताप व्यक्त केला. नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर मिळकत कर वसूल करणाऱ्या महानगरपालिकेने वर्षानुवर्षे साधी पावसाळी स्टॉर्म वॉटर लाईन टाकू नये याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गेली १० वर्षे हा प्रश्न अधिकाऱ्यांनी तसाच खितपत ठेवला. आता हा प्रश्न आम आदमी पार्टी उचलून धरेल असे मत व्यक्त केले. यावेळी आम आदमी पार्टीचे प्रभाग अध्यक्ष तानाजी शेरखाने, सुनीता शेरखाने, संजय कोणे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून या विषयी प्रश्नाचे गांभीर्य समजावून सांगितले.

नगररोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बनकर यांनी याबाबत तातडीने पावसाळी पाईपलाईन बाबत तातडीने प्रस्ताव बनवून अतिरिक्त आयुक्त व प्रकल्प अधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. तसेच या पावसाळ्यात नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे क्षेत्रीय अभियंता यांना आदेश दिले. आपले घर परिसरातील झाडू सफाई व कचरा उचलण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!