
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्षांतर पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमधील अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी तर महायुतीमध्ये प्रवेश केलाच आहे. मात्र दुसरीकडे भाजपने आपले मित्र पक्ष असलेले शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. या दोन्ही मित्र पक्षातून भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. त्यामुळे आता महायुतीमधून नाराजीचा सूर उमटत असल्याचं दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या सर्व मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घातला होता, यामधून ही नाराजी दिसून आली.

दरम्यान त्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 50 मिनिटं चर्चा झाली, राज्यात सुरू असलेल्या या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे सर्वाचंं लक्ष लागलं होतं. दरम्यान दुसरीकडे मात्र महायुतीमध्ये सर्व अलबेल असल्याचा दावा तीनही घटक पक्षांकडून करण्यात येत आहे. दरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. हिंगोलीमध्ये भाजपच्या उमेदवारानं अचानक माघार घेतली असून, शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा हिंगोलीमध्ये भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. हिंगोली नगरपरिषदेच्या नगरसेवक पदासाठी भास्कर बांगर यांनी वार्ड क्रमांक 16 ब मधून भाजपच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघा एक दिवस बाकी असतानाच त्यांनी निवडणुकीतून माघार घेत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधला आहे. उमेदवारानं ऐनवेळेस माघार घेतल्यामुळे हा आता भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.


