एकाच तरुणाशी लग्न करणाऱ्या जुळ्या बहिणींना मोठा धक्का
दोन जुळ्या बहिणींच्या वादात नवा ट्विस्ट,नवरदेव अडकला अडचणीत
अकलुज दि ६(प्रतिनिधी)- सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे कांदिवली येथील दोन जुळ्या बहिणींनी एकाच तरूणाशी विवाह केला होता. सोशल मीडीयावर या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. हा विवाह सोहळा शुक्रवारी अकलूज-वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे मोठ्या थाटामटात संपन्न झाला होता. पण आता समोर आलेल्या माहितीमुळे दोन्ही बहिणींचे धाबे दणाणले आहेत.
माळेवाडी-अकलूज येथे एकाच वेळी दोन वधूंशी विवाह केल्याप्रकरणी वराविरुद्ध अकलूज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, अकलूज पोलिसांनी द्विभार्या प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. माळेवाडी अकलूज येथील हॉटेल गलांडे येथे शुक्रवारी अतुल आवताडे याने कांदिवली येथील रिंकी व पिंकी या जुळ्या बहिणींशी एकाच वेळी विवाह करून द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले म्हणून माळेवाडी-अकलूज येथीलच राहुल फुले या युवकाने अकलूज पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. आता, याप्रकरणात नवरदेव अतुल आवताडेच्या पहिल्या बायकोची एंट्री झाली आहे. अतुलचं यापूर्वीच लग्न झालं असून त्याच्या पहिल्या बायकोने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. पोलीस चौकशीत अतुलचं याअगोदरच लग्न झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे, आता मुलीकडच्या मंडळींचे धाबे दणाणले आहेत. कारण, पहिल्या पत्नीच्या तक्रारीवरुन मुलीकडच्या मंडळींवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
जुळ्या बहिणींनी एकाच मुलाबरोबर लग्न केल्यामुळे सोशल मीडियावर; मिम्सचा अक्षरश: पाऊस पडला आहे. खरं तर हे लग्न पार पडले असले तरी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवावर गुन्हा दाखल झाल्यामुळे नव्या संसाराला सुरुवात करण्याआधीच त्यांच्या आनंदावर विरजण पडल्याने पुन्हा एकदा या लग्नाची चर्चा रंगली आहे. त्यातच आता महिला आयोगाने कारवाईचे आदेश, पहिल्या बायकोची एंट्री यामुळे युवकाच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.