
विधान परिषदेसाठी भाजपाकडून उमेदवारांची घोषणा
फडणवीसांच्या 'या' निकटवर्तीयांना मिळाली संधी, पहा कोणाला लागली लाॅटरी
मुंबई – विधान परिषदेतील एकूण पाच आमदार विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त जागांवर निवडणूक होणार आहे. त्यामुळे याकरिता भाजपाकडून विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची यादी दिल्लीला पाठविण्यात आली होती. आता दिल्लीकडून तीन नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
भाजपा केंद्रीय कार्यालयाकडून तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. भाजपा केंद्रीय कार्यालयाने रविवारी सकाळीच सोशल मीडियाच्या माध्यमातून विधानपरिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पक्षाकडून संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी २७ मार्चला निवडणूक घेण्यात येणार आहे. विधान परिषदेतील या पाच जागांसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत होती. विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाल्यानंतर महायुतीत पाच जागांमध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वाटेला किती जागा येणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण भाजपाने आपल्या जागा स्व:तकडे कायम ठेवल्या आहेत. त्यामुळे आता अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना हे प्रत्येकी एका-एका जागेवर निवडणूक लढवणार आहे. भाजपाने जाहीर केलेल्या यादीमध्ये छत्रपती संभाजीनगरचे संजय केनेकर, वर्धाचे दादाराव केचे आणि नागपूरचे संदीप जोशी यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपाने जाहीर केलेल्या यादीवर मुख्यमंत्री व महाराष्ट्र भाजपाचा चेहरा असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव दिसत आहे. कारण हे तिन्ही उमेदवार फडणवीसांच्या जवळचे मानले जातात.
विधानपरिषदेचे सदस्य असलेले आमश्या पाडवी, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि राजेश विटेकर हे विधानसभेवर निवडून गेल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.