एकनाथ शिंदे गटातील ‘हा’ नेता भाजपाला नकोसा
नेत्याच्या हकालपट्टीसाठी भाजपाचा शिंदेवर दबाव, शिंदेची कोंडी?
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- शिवसेनेत मोठी फूट पाडल्यानंतर भाजपसोबत संसार थाटणाऱ्या एकनाथ शिंदे यांची भाजपाने आता कोंडी करायला सुरुवात केली आहे. कारण मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच होणार आहे. त्यात आपलाच प्रभाव रहावा अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे शिंदेच्या अडचणी वाढल्या आहेत. पण आता थेट शिंदे गटातील काही नेत्यांवरच भाजपाने आक्षेप घेतला आहे.
मुंबई महापालिका निवडणूकीपुर्वी शिंदे गटातील मुंबईचा एक नेता भाजपला नको असल्याचे दिसून येत आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी तर उघडपणे त्या नेत्याचे नाव घेतल्याने शिंदेंची कोंडी झाली आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती यशवंत जाधव यांच्यावर अनेक आरोप यापूर्वी झाले आहेत. त्यांच्या पत्नी तथा आमदार यामिनी जाधव या सध्या शिंदे गटात आहेत. जाधव दाम्पत्य शिंदे गटात असले तरी सध्या भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. कारण जाधव तुमच्यासोबत आल्याने त्यांना क्लिन चिट मिळाली का असा सवाल पत्रकारांनी विचारल होता.त्यावर शेलार म्हणाले, “मुंबई महापालिकेत भाजप हा शिंदे गटासोबत १५०चा आकडा पार करेल. यानंतर आम्ही महापालिकेत ‘सेवालय’ सुरू करू. आतापर्यंत कंत्राटदारांचे केवळ ‘वसुलीआलय’ उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सुरू होते. आम्ही भाजप आणि शिवसेना मिळून खऱ्या अर्थाने सेवालय सुरू करू. तसेच, या ‘सेवालया’च्या दरवाजात यशवंत जाधवांसारख्या प्रवृत्तीचा एकही माणूस नसेल, असे म्हटल्याने शिंदे यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. अगोदरच शिंदे गटातील बरेच नेते मंत्रीपदाकडे आस लावून बसले आहेत. त्यांची नाराजी दुर करण्याचे प्रयत्न करताना भाजपाच्या नवनवीन डिमांड शिंदेकडे होत असल्याने भाजपा की आपले नेते अशा दुहेरी संकटात एकनाथ शिंदे सापडले आहेत.
भाजपाकडून शिंदे गटाच्या एखाद्या नेत्याबद्दल आक्षेप घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही मंत्रिमंडळ विस्ताराआधी संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्या नावावर आक्षेप घेण्यात आला होता. पण ती चर्चा बंद खोलीत झाली होती. पण आता उघडपणे भाजपाने नाव घेतल्याने शिंदे काय भुमिका घेणार हे पहावे लागेल.