
भाजपा आमदार म्हणतात मीच शिवसेनेचा बाप
भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान, शिंदे गट आक्रमक, महायुतीत वादाची ठिणगी, सततच्या कोंडीने शिंदे गटात अस्वस्थता
भंडारा – राज्यात महायुती सत्तेत असली तरीही महायुतीमधील वाद आता नवीन राहिलेले नाहीत.सतत कोणत्याना कोणत्या कारणावरून त्यांच्यात खटके उडत असतात. त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक जवळ आल्यामुळे आणखी नवीन वादांना तोंड फुटत आहे. भाजपा आमदाराने शिंदे गटाला डिवचले आहे.
भाजपचे आमदार परिणय फुके यांनी पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात आपण शिवसेनेचा बाप असल्याचे वक्तव्य केले. या विधानामुळे शिवसेना कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. आमदार परिणय फुके म्हणाले की, माझ्यावर अनेक लोक आरोप करतात. मी कुठल्याही आरोपाला उत्तर देत नाही. परंतु त्यादिवशी माझ्या चांगले लक्षात आले, जर एखादा मुलगा परीक्षेत चांगले मार्क्स मिळवत असेल तर त्याची नाहीतर आईचं कौतुक केले जाते. काही चांगले झाले तर आईने केले किंवा त्या मुलाने केले. याउलट जर काही वाईट झाले तर दोष बापावर केला जातो. त्यामुळे मला पक्कं माहिती झालं, शिवसेनेचा बाप मीच आहे. खापर माझ्यावर फोडले जाते असं त्यांनी विधान केले.त्यावर शिंदेसेना नाराज झाली असून फुके यांनी 12 तासांच्या आत त्यांच्या विधानाबद्दल माफी मागावी अन्यथा आम्ही शिवसेना शैलीत त्यांना योग्य उत्तर देऊ,असा इशारा शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. तसेच फुके यांनी शिवसेनेबद्दल अपमानास्पद भाषा वापरून कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा नेत्याला आवरावे,अन्यथा शिवसेनेचा बाप कोण आहे हे आम्ही सांगू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेनेचे बाप आहेत. कुणीही बळजबरीने शिवसेनेचे अवैध बाप बनण्याचा प्रयत्न करू नये. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत फुके यांनी शिवसेनेचे उमेदवार डॉ. प्रकाश मालगावे यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस उमेदवाराला सहा मते देण्याचे षड्यंत्र रचले. त्यामुळे मालगावे यांना पराभवाला सामोरे जावे लागले, असा आरोप शिंदे गटाने केला आहे.