
भाजप खासदार प्रीतम मुंडेची कुस्तीपटुंच्या आंदोलनावरुन सरकारवरच टीका
घरचा आहेर देत व्यक्त केली नाराजी, पंकजा मुंडे नंतर प्रीतम मुंडेही भाजपावर नाराज?
बीड दि २(प्रतिनिधी)- लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून कुस्तीपटूंनी एप्रिलपासून आंदोलन सुरु केले आहे. पण अद्यापही केंद्र सरकारने त्याची दखल घेतली नाही. उलट नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्यावेळी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यामुळे भाजपावर जोरदार टिका देखील झाली. पण आता भाजपाच्या खासदार प्रीतम मुंडे यांनीच भाजपाला खडे बोल सुनावले आहेत.
भाजपच्या बीडच्या खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनावर भाष्य करत आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. या प्रकरणात त्या खेळाडूंशी संवाद साधायला सरकारकडून कोणी गेले नाही, ही खेदाची बाब आहे. सरकारनं खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता, असे मत प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर केवळ खासदारच नाही तर एक महिला म्हणूनही मला त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. असे आरोप जेव्हा होतात, तेव्हा त्याची वेळेवर चौकशी व्हायला हवी होती, यातील सत्य समोर यायला हवं होतं. सरकारकडून त्या महिला खेळाडूंशी संवाद साधायला कोणीच गेलं नाही. ते व्हायला हवं होतं. या प्रकरणात योग्य ती कारवाई व्हायला हवी, अशी स्पष्ट भूमिका प्रितम मुंडे यांनी घेतली आहे. आंदोलनाला आत्तापर्यंत कोणत्याही भाजप नेत्याने पाठिंबा दर्शवला नव्हता, पण आता मुंडे यांनी सरळसरळ सरकारवर निशाना साधला आहे. यावेळी त्यांनी शेतकरी सन्मान योजनेवर देखील प्रश्न उपस्थित केले. ६ हजार रुपये देणे हा शेतकऱ्यांचा सन्मान नाही. आज पिकांची, शेतीची जी दुरावस्था झाली आहे ती मनुष्य निर्मित नाही, तर निसर्गनिर्मित आहे. या आपत्तीमुळे जागतिक बाजारपेठेवर परिणाम होतो. त्यामुळे शेतीमालाचे भाव घसरतात असे मुंडे म्हणाल्या आहेत. दरम्यान कुस्तीपटूंना समर्थन आणि शेतकरी सन्मान योजनेवर नाराजी व्यक्त करत प्रीतम मुंडे यांनी थेट भाजपाच्या हायकमांडबरोबरच पंगा घेतल्याचे दिसत आहे.
प्रीतम मुंडे यांनी याआधीही खासदार निधीवरुन सरकारला टोला लगावला होता. त्यावेळीही त्याची जोरदार चर्चा झाली होती. पण पंकजा मुंडे यांनी काल भाजपात नाराज असल्याचे केलेले विधान आणि प्रीतम मुंडे यांनी भाजपावर केलेली टिका हा केवळ योगायोग आहे की, भाजपतुन बाहेर पडण्याचे संकेत आहेत, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.