भाजपाने चिंचवडचा गड राखला अश्विनी जगताप विजयी
महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका, जगताप इतक्या मतांनी दणदणीत विजयी
पुणे दि २(प्रतिनिधी)- चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून भाजपा उमेदवार अश्विनी जगताप यांनी ३६ हजार ९१ मतांनी नाना काटे यांचा पराभव केला आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा फटका महाविकास आघाडीला बसला आहे.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपानं पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती. सकाळी मतमोजणीला सुरूवात झाल्यापासून पहिल्या फेरीपासून अश्विनी जगताप यांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. निवडणूकीत भाजपाचे अश्विनी जगताप यांना १ लाख ३५ हजार ४३४ मते मिळाली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना ९९ हजार ३४३ मते मिळाली. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ४४ हजार ०८२ मते मिळाली. तिरंगी लढतीचा फायदा अश्विनी जगताप यांना झाल्याचे दिसून आले. विजयानंतर बोलताना जगताप म्हणाल्या की, “मी हा विजय सर्वसामान्य जनतेला आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित करते. भाजपाचे नेते, कार्यकर्ते आणि जनतेला माझ्या पाठिशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद देते. अशा पद्धतीने निवडणूक लढवावी लागेल, असा विचार मी कधीच केला नव्हता. लोकांसाठीची लक्ष्मण जगताप यांची अपुरी राहिलेली कामं आहेत, ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे” असे त्या म्हणाल्या आहेत. या विजयानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.
“मतदान होण्याच्या दोन दिवस आधी सत्ताधाऱ्यांनी आमचे बरेच कार्यकर्ते पोलीस बळ वापरून उचलले होते. त्यानंतर पैशांचा मोठ्या प्रमाणावर इथे वापर झाला. सगळे कार्यकर्ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचले. पण बंडखोरीचा फटका नक्कीच बसला आहे. आम्ही जोमानं काम करू’ अशी प्रतिक्रिया पराभूत उमेदवार नाना काटे यांनी दिली आहे.