Latest Marathi News

भाजपाचे धक्कातंत्र! हा आदिवासी आमदार होणार नवीन मुख्यमंत्री

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा नवीन गेमप्लान, मात्तबर नावांवर मात करत कोण ठरले नवे मुख्यमंत्री

रायपूर दि १०(प्रतिनिधी)- देशात नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाने मोठे यश मिळवले होते. राजस्थान, मध्यप्रदेश मध्ये सत्ता हस्तगत करत भाजपाने छत्तीसगडमध्ये देखील बहुमत मिळवत अनेकांना चकित केले होते. दरम्यान मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यात मुख्यमंत्री कोण हा प्रश्न बाकी असताना भाजपाने छत्तीसगडमधील मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली आहे. यापदासाठी भाजपाने आपले धक्कातंत्र राबवत आदिवासी चेहऱ्याला संधी दिली आहे.

आदिवासी समुदायातून येणारे विष्णुदेव साय, हे आता छत्तीसगडच्यामुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणार आहेत. रायपूरमध्ये भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बेठकीत साय यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं मुख्यमंत्रिपदासाठी विष्णुदेव साय यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता, ज्यावर सर्व आमदारांचं एकमत झाले. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी अनेक दावेदार होते. त्यात माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांचं नावही आघाडीवर होते. मात्र केंद्रीय नेतृत्वानं विष्णुदेव साय यांना पसंती दिली. विष्णू देव साई हे कुंकरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून आमदार झाले आहेत. तसेच ते रायगड लोकसभा मतदारसंघातून खासदारही राहिले आहेत. दरम्यान साय यांच्या रुपाने छत्तीसगडमध्ये पहिल्यांदाच आदिवासी नेता मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहे. दरम्यान विष्णुदेव साय भाजपचे जेष्ठ नेते आहेतच, पण अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय राज्यमंत्री देखील राहिले होते. त्यांच्या राजकीय अनुभवाचा छत्तीसगड मधले सरकार चालवण्यात भाजपला चांगला उपयोग होईल, असे वक्तव्य ओम प्रकाश माथूर यांनी केले आहे. महत्त्वाचे म्हणजे छत्तीसगडमध्ये भाजपने कोणत्याही नेत्याचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी जनतेसमोर ठेवला नव्हता. पंतप्रधान नेतृत्व नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सामुदायिक नेतृत्वाच्या आधारे छत्तीसगडमध्ये निवडणुकीला सामोरा गेला. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष पद विष्णुदेव साय यांच्याकडे होते.

भाजपने छत्तीसगडमध्ये खांदेपालट केल्यानंतर आता मध्य प्रदेश आणि राजस्थानातही असाच खांदेपालट करणार, अशा अटकळी बांधल्या जाऊ लागल्या आहेत. सध्या राजस्थान मध्ये वसुंधरा राजे तर मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चाैहान यांची नावे चर्चेत आहेत. पण एैनवेळी नवीन नाव चर्चेत येणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा वेगळा निर्णय देखील घेऊ शकते अशी चर्चा आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!