भाजपा लोकसभेला शिवसेनेला देणार ‘तीनच’ जागा?
कोल्हापूरातील अमित शहांच्या त्या ना-यामुळे शिंदे गटात अस्वस्थता, भाजपाकडुन दबाव?
कोल्हापूर दि २०(प्रतिनिधी)- शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेना मिळाल्यानंतर आगामी निवडणुका भाजपा आणि शिंदे गट म्हणजेच शिवसेना एकत्र लढणार असल्याची घोषणा अमित शहांनी केली पण पुढे कोल्हापूरात मात्र अमित शहांनी पुन्हा एकदा शत प्रतिशत भाजपाचा नारा दिल्यामुळे भाजपा शिंदे गटाला नेमक्या किती जागा देणार याची चर्चा सुरु झाली आहे.
महाराष्ट्र दाै-यावर आलेले अमित शहा यांनी कोल्हापुरात जाहीर सभा घेतली यावेळी त्यांनी लोकसभेत महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा भाजप आणि मोदींच्या झोळीत टाका अशी साद घातली आहे. तर आधीपासून भाजपने राज्यात मिशन ४५ चा नारा दिला आहे. त्यामुळे शिंदे गटाला लोकसभेत फक्त तीन जागा मिळतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर भाजपाने शिवसेनेचे खासदार असलेल्या मतदारसंघात दाैरा करत आगामी काळात त्या जागा भाजपासाठी घेण्याबाबत चाचपणी केली होती. यात एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघाचाही समावेश होता. त्यात भाजपाने शिवसेनेच्या काही खासदारांना हाती कमळ घेतले तरच लोकसभेला सर्व मदत करण्याचे आश्वासन दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे भाजपा शिवसेना युती झाली असली तरीही जागा वाटपात मात्र खटके उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपाचा सगळीकडेच स्वबळाचा नारा राहिलेला आहे. त्यात २०१९ साली भाजपाचे वरिष्ठ नेते शिवसेनेसोबत युती करण्यास उत्सुक नव्हते. मध्यंतरी मुंबई महापालिका निवडणूकीसाठी अमित शहांनी भाजपाला स्वबळावर सत्ता देण्याचे आवाहन केले आहे. त्यात आता लोकसभा निवडणुकीतही शत प्रतिशत भाजपाचा नारा दिल्यामुळे दोन पक्षातील वाद रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.