
भाजपा पुढच्या लोकसभा निवडणूकीला १५० जागाही जिंकणार नाही
भाजपा खासदाराचा स्वतः च्या पक्षाला घरचा आहेर, भाजपा जिंकण्याचे कारण सांगितले, स्वतः च्या पक्षातील नेत्यावर टिका
दिल्ली – भाजपचे नेते आणि गोड्डा (झारखंड) येथील खासदार निशिकांत दुबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काैतुक करताना भाजपाच्या मर्यादा उघड केल्या आहेत. यावेळी दुबे यांनी परत एकदा ठाकरे बंधूना लक्ष्य करत टिका केली आहे.
निशिकांत दुबे यांनी यावेळी आपल्याच पक्षातील नेत्यांना टार्गेट केले आहे. मोदींना भाजपची नव्हे भाजपला मोदींची गरज असल्याचे दुबे म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचे नेते नसतील तर भाजपा १५० जागा देखील जिंकू शकणार नाही असा मोठा दावा दुबेंनी केला आहे. मला वाटतं की पुढील १५ ते २० वर्षांसाठी दिल्लीत फक्त मोदीच आहेत असं वाटतं. जर नरेंद्र मोदी आमचे नेते नसतील तर भारतीय जनता पक्ष १५० जागाही जिंकू शकणार नाही. भारतीय जनता पक्षाची ही मजबुरी आहे की २०२९ ची लोकसभेची निवडणूक देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात लढावी लागेल”, असे निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी ७५ व्या वर्षी निवृत्त होण्याबाबत एक विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावरून निशिकांत दुबे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. तसेच मोदी नंतर योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री होतील अशी चर्चा रंगली होती, याबाबत दुबे यांना विचारले असता, दिल्लीत कोणतीही जागा रिकामी नाही, असा टोला लगावला आहे. निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्यावर टिका केली आहे. “मी खासदार आहे. मी कायदा हातात घेणार नाही. पण जनतेचा रोष कोणी थोपवू शकणार नाही.” असा सूचक इशाराही दुबे यांनी दिला आहे. त्यामुळे दुबेंच्या वक्तव्यांची मोठी चर्चा होत आहे.
निशिकांत दुबे यांनी २००९ मध्ये राजकारणात पाऊल ठेवलं. त्यानंतर ते सलग गोड्डा मतदारसंघातून विजयी होत आहेत. ही त्यांची चाैथी टर्म आहे. २०२४ साली त्यांनी काँग्रेसचे प्रदिम यादव यांचा एक लाख मतांनी पराभव केला होता.