उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर बॉम्ब!
फोनमुळे पोलिसांची एकच धावपळ, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
नागपूर दि २८(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील घराबाहेर बॉम्ब ठेवल्याच्या फोनने एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी मध्यरात्री आलेल्या फोनमुळे पोलिसांची मोठी धावपळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी धमकी देणाऱ्या एका व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फोन करणारा व्यक्ती हा नागपूरच्या कन्हान भागातील राहणारा आहे. घरची वीज गेली म्हणून रागाच्या भरात त्याने देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा फोन केला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने फडणवीसांच्या घरी घेत बॉम्ब शोधक पथक दाखल झाले पण असा कोणताही बॉम्ब नसल्याचे पोलिसांनी सांगितले पण खबरदारी म्हणून फडणवीसांच्या घराची पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली होती. धमकीचा कॉल करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच पुढील कारवाई केली जात आहे, अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. फडणवीस यांच्या निवासस्थानी नेहमीप्रमाणेच सुरक्षाव्यवस्था आहे. नेहमीप्रमाणेच इथलं कामकाज सुरु आहे. परंतु नागपूर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे.
दोन दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देखील धमकीचा फोन आला होता. गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा याचा ताबा नागपूर पोलिसांना मिळाला आहे. जयेश पुजारीला बेळगावमध्ये अटक झाली होती.