मुंबई दि ११ (प्रतिनिधी)- धनुष्यबाण कुणाचा यावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये वाद सुरू आहे. या संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शिवसेनेने आयोगोकडून चार आठवड्यांची मुदत मागितली होती.पण निवडणूक आयोगाकडून त्यांना पूर्ण वेळ द्यायला नकार दिला आहे. त्यांना उत्तरासाठी अवघ्या पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे.हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे.
निवडणूक आयोगाकडे ८ तारखेला झालेल्या सुनावणीवेळी शिवसेनेने एक महिन्याची मुदत मागितली होती. पण आता मात्र १५ दिवसांचीच मुदत देण्यात आल्याने उद्धव ठाकरे यांना आता २३ ऑगस्टपर्यंत आपले म्हणणे मांडावेच लागणार आहे. त्या आधी राज्यातील सत्तासंघर्षावर २२ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यामुळे न्यायालयाच्या पाठोपाठ निवडणूक आयोगातही ठाकरे गटाचे टेन्शन वाढणार असल्याचे चित्र आहे. निर्णय घेण्यास मनाई केली असली तरीही बाजू ऎकून निर्णय राखून ठेवण्यास निवडणूक आयोगाला कोणतीही बंधने घालण्यात आली नव्हती त्यामुळे निवडणूक आयोगाने १५ दिवसांची मुदत दिली आहे.
लोकसभा, विधानसभा तसेच शिवसेनेच्या राजकीय पक्ष रचनेतही आपले प्राबल्य असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यासाठीची आकडेवारी देखील त्यांनी निवडणूक आयोगासमोर मांडली आहे. तर संघटना पातळीवरही त्यांनी तयारी सुरु केली आहे. त्यामुळे धनुष्यबाण ठाकरेंकडे राहणार कि जाणार यासाठी न्यायालय आणि आयोग या दोन्ही पातळीवर उद्धव ठाकरे यांना संघर्ष करावा लागणार आहे.