पुणेकरांना गंडा घालणाऱ्या बंटी बबलीच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या
पुणे पोलिसांना चकमा देणारी जोडी अटकेत, असे करायचे चोरी
पुणे दि १०(प्रतिनिधी)- पुणे पोलीसांनी एक मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी पेशाने व्यवसायीक आणि वकील करोडीपती बंटी बबलीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुणे शहरात अनेकांना गंडा घालत मोठी माया जमवली होती. पण अखेर पुणे पोलीसांनी त्यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात बंटी बबलींनी हातचलाखी करून लुटण्याचा धुमाकूळ घातला होता. त्यांनी अनेकांना गंडा घातला आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लोकांच्या घरातील लक्ष्मी लंपास करणारे बंटी बबली स्वतः मात्र करोडपती झाले होते. राजीव काळमे आणि त्याची मेहुणी सोनिया पाटील या दोघांना अलंकार पोलिसांनी मुद्देमालासह बेड्या ठोकल्या आहेत. राजीव मूळचा अमरावतीचा आहे. राजीव हाॅटेल व्यावसायिक होता तर सोनिया वकीलीचे शिक्षण घेत होती. या जोडीने कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या जयंत इनामदार यांच्या बंगल्यात घरफोडी करत हिऱ्यांच्या दागिन्यासह तब्बल ९८ लाखांचा मौल्यवान ऐवज लंपास केला होता. त्यानंतर पोलीसांनी तपास सुरु केला होता. त्यात त्यांना यश आले आहे.
बंटी बबली घरफोडी करण्याच्या आधी ही जोडी फॉर्च्यूनर गाडीतून परिसराची रेकी करायची आणि त्यानंतर बंद असलेल्या घरात प्रवेश करून डाव साधायचे परंतु पुणे पोलिसांनी १०० पेक्षा जास्त ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज गोळा करून तपासले आणि त्यातून ही जोडी पोलिसांच्या हाती लागली. या कामगिरीमुळे पुणे पोलिसांच्या कामाचे कौतुक होत आहे.