धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करत आहात का?
कधी खरेदी कराल सोने-चांदी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात बदल, जाणून घ्या दर
पुणे दि १०(प्रतिनिधी)- सर्वात मोठा सण अशी ओळख असलेल्या दिवाळी सणाची सुरुवात झाली आहे. आज धनत्रयोदशी आहे. या दिवशी सोने खरेदी केली जाते. कारण या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी अनेकजण लोक सोने-चांदी खरेदी करतात. पण आज सोन्याचा दरात वाढ झाली आहे.
शुद्ध सोन्याच्या दरात आज ३४८ रुपयांनी वाढ झाली आहे. २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ६०,४४५ रुपयांवर खुला झाला. काल गुरुवारी हा दर ६०,०९७ रुपयांवर बंद झाला होता. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ५६,०९० रुपये आहे. तसेच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीचा प्रति किलो दर कालच्या ७०,३०० रुपयांच्या तुलनेत आज ७०,८५० रुपयांवर खुला झाला आहे. त्याचबरोबर सोने खरेदी करताना मुहूर्त देखील पाहिला जातो. धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त १० नोव्हेंबर रोजी दुपारी १२:३५ वाजता सुरू होणार असून ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १:५७ पर्यंत असणार आहे. दरम्यान या मुहूर्तावर कधीही खरेदी करू शकता. म्हणजेच धनत्रयोदशीला सोन्याचे नाणे किंवा दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यासाठी शुभ मुहूर्त दुपारी १२:३५ पासून सुरु होणार असून, जे लोक ११ नोव्हेंबरला सोने खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांनी दुपारी १:५७ पर्यंत सोन्याची खरेदी करावी. धनतेरसला धनत्रयोदशी असेही म्हणतात. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान धन्वंतरी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. याशिवाय गणेश-लक्ष्मीची मूर्ती, मातीचा दिवा इत्यादी वस्तू खरेदी कराव्यात. याशिवाय तुम्ही श्री यंत्र, लक्ष्मी यंत्र इत्यादी खरेदी करू शकता. धनत्रयोदशीच्या विशेष प्रसंगी गोवऱ्या, संपूर्ण धणे, हळद, झाडू इत्यादी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते.
धनत्रयोदशीला पूजेसाठी शुभ मुहूर्त हा प्रदोष काळात संध्याकाळी ५:३० ते रात्री ०८:०८ पर्यंत आहे. तर वृषभ काळ हा संध्याकाळी ०५:४७ ते ०७:४७ पर्यंत आहे. धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करायची असेल, तर संध्याकाळी ५:०७ ते ७:४३ या वेळेत खरेदी करता येईल.
(टीप- वरील माहिती पंचागावर आधारित आहे. आपल्या जबाबदारीवर खरेदी करावी)