
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये मध्यरात्री देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात होर्डिंग्ज लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला. यानंतर हे पोस्टर लावणाऱ्या ५ जणांना अटक करण्याल आली आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा कट तेलंगणामधून रचण्यात आला होता, तसेच पोस्टर तेलंगणा राष्ट्र समितीच्या नेत्याने इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या ऑपरेटर्सकडून छापले होते. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की या कामासाठी ऑपरेटरला तेलंगणातून फोन आला आणि त्याला १० हजार रुपयांमध्ये कंत्राट देण्यात आले होते.
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज शहरात रिझर्व्ह पोलिस लाईनजवळील मुख्य रस्त्यावर अज्ञात लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात संदेश असलेले हे होर्डिंग लावले होते. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या (BJPYM नेत्यासह तेथे येणाऱ्या लोकांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली, त्यानंतर शनिवारी हे होर्डिंग हटवण्यात आले. त्यानंतर याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. होर्डिंग लावणारे मजूर आणि सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी नंतर आरोपींचा शोध घेतला.