
अत्याचार करत दोन कोटी उकळणाऱ्या शिंदे समर्थकावर गुन्हा दाखल
बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकारही समोर
संभाजीनगर दि १२ (प्रतिनिधी)- युवासेनेचा माजी पदाधिकारी आणि आता शिंदे गटामध्ये सामील झालेला ज्योतीराम विठ्ठल धोंगडे-पाटील याने एका विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आरोपावरून औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योतीराम धोंडगे-पाटील हा महापालिकेच्या टँकरने संभाजीनगरमधील जयभवानीनगर भागात पाणी पुरवठा करत होता. यादरम्यान त्याची एका महिलेसोबत ओळख झाली. पाणी पुरवठ्याच्या निमित्ताने दोघांची ओळख वाढत गेली. ज्योतीराम याने त्या महिलेच्या पतीसोबतही मैत्रीचे संबंध निर्माण केले. त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. यावेळी त्याने तिचा एक अश्लील व्हिडिओही शूट केला. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेकडून जवळपास दोन कोटी रुपये उकळले यात रोख रक्कम, दागिने, आणि मोबाईल याचा समावेश होता तसेच पिडीता गर्भवती राहिल्यानंतर बंदुकीचा धाक दाखवत गर्भपात केला. आपल्या सर्व आर्थिक गरजा त्याने पिडीतेकडूनच पूर्ण करुन घेतल्या. पण त्याच्या त्रासाला कंटाळून अखेर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मुकूंदवाडी पोलिस ठाण्यात पिडितेने तक्रार दिल्यानंतर बलात्कार, खुनाचा प्रयत्न, गर्भपात करण्यासह सात कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्योतीराम यापूर्वी युवासेनेचा शहरप्रमुख होता. अनेक बड्या पोलिस अधिकाऱ्यांसोबत त्याचा वावर पहायला मिळायचा. शिवसेनेत फुट पडल्यानंतर त्याने शिंदे गटात प्रवेश केला होता. तसेच एकनाथ शिंदे यांच्या सत्कारात तो पुढे दिसून आला. स्वतःचा युवा मंच असल्याने तो सोशल मिडीयावरही प्रसिद्ध होता. पण अत्याचार प्रकरणी त्याचे नाव आल्याने खळबळ उडाली आहे.