किशोर आवारे हत्येप्रकरणात आमदार सुनील शेळकेंवर गुन्हा दाखल
मावळसह पुणे जिल्ह्यात खळबळ, राजकीय वैमनस्यातून हत्या केल्याचा आईचा आरोप
पुणे दि १३(प्रतिनिधी)- तळेगांव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर शुक्रवारी दिवसाढवळ्या खून करण्यात आला होता. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
किशोर गंगाराम आवारे हत्येप्रकरणी आमदार सुनील शेळके, त्यांचा भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर व त्याचे तीन साथीदार यांच्या विरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आवारे यांच्या मातोश्री सुलोचना गंगाराम आवारे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दाखल केलेल्या या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे की, माझा मुलगा किशोर हा सामाजिक काम करत होता. त्याचं काम सुनील शेळके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना खटकत होत. कारण शेळके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चुकीच्या कामाच्या विरोधात आवारे नेहमीच आंदोलन, निदर्शने करत होते. त्यातून त्यांनी ही हत्या केली. तर गेल्या सहा महिन्यांपासून किशोर आवारे हे शेळके यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत होते. असा आरोप आवारे यांच्या आईने पोलिसांत देखल केलेल्या आरोप पत्रामध्ये केला आहे. दरम्यान एफआयआरमध्ये आमदार सुनील शेळके यांचं नाव आल्याने एकच खळबळ उडाली आहे. किशोर यांनी स्वतःचा वेगळा गट तयार करून सुनिल शेळके यांना गेल्या दोन वर्षापासून पूर्णपणे राजकीय विरोध केला आहे. त्यामुळे किशोर आवारे याचे राजकीय वर्चस्व निर्माण होवुन सुनिल शेळके व सुधाकर शेळके यांच्या राजकीय वर्चस्वाला धोका निर्माण झाला होता. त्यातुन ही हत्या करण्यात आल्याचा आरोप किशोर आवारे यांच्या आई सुलोचना आवारे यांनी केला आहे.
किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन खाली आले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या ४ जणांनी त्यांच्यावर खूनी हल्ला केला. तर दोघाजणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. तर दोन जणांनी कोयत्याने वार करत हत्या केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण पाटील करीत आहेत.