जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अजित पवार? पुण्यात बॅनरबाजी
अजित पवार मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत, एकनाथ शिंदेच्या अडचणी वाढणार?
पुणे दि २२(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासुन विरोधी पक्षनेते अजित पवार हे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अजित पवार भाजपसोबत जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात असताना खुद्द याबाबत त्यांनीच उत्तर देत या विषयाला पूर्णविराम दिला. मात्र आता पुन्हा एकदा या चर्चा सुरु झाल्या आहेत. पण अजित पवार यांनी मी आत्ताही मुख्यमंत्री होऊ शकतो असे विधान केल्याने पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत.
मुख्यमंत्रिपदावर दावा करण्याची गरज काय, मी आताही दावा सांगू शकतो. २०२४ ची कशाला वाट बघू, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपदाबद्दल मनातलं बोलून दाखवलं. यानंतर आता अजित पवार यांचा जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करत बॅनर लावले आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. पुण्यातील कोथरूडमध्ये हे बॅनर्स झळकले आहेत. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं या बॅनर्सवर लिहिलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू अजित पवार.असंही बॅनर्सवर लिहिलं आहे. या बॅनर्सवर अजितदादा पवार यांचा भला मोठा फोटो आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स लावले आहेत. अजित पवार यांनी एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं म्हटलं होतं. तसेच राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचं आकर्षण नाही. पण मख्यमंत्रीपदाची दावा ठेवण्याची आताही तयारी आहे, असं सूचक विधानही त्यांनी केलं होतं. या फ्लेक्सबाबत संतोष डोक यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मी मागील १८ वर्षापासून कोथरूड परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमांतून काम करत आहे. या कालावधीत अनेक उपक्रम राबविली असून आमचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, ही राज्यातील सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे. तसेच, दादा लवकरच मुख्यमंत्री व्हावेत हीच माझी देखील इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
२००४मध्ये काँग्रेसबरोबर आमची आघाडी होती. राष्ट्रवादीच्या ७१ जागा निवडून आल्या होत्या आणि काँग्रेसच्या ६९ जागा आल्या होत्या. मात्र त्यावेळी कॉंग्रेसला वाटत होतं की यावेळी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद दिलं जाईल. असे वाटल्याने राष्ट्रवादीने आर. आर. पाटील यांची निवड केली होती. त्यावेळी जर मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आलं असतं तर आर. आर. पाटील मुख्यमंत्री झाले असते. पण तसे घडू शकले नाही.