Latest Marathi News
Ganesh J GIF

‘माझ्या बापाच्या नादी लागू नको’ म्हणत आमदाराला धमकी

धमकीमुळे आमदार धास्तावले म्हणाले यांच्या हातून मरण्यापेक्षा मी आत्महत्या…

नाशिक दि २२(प्रतिनिधी)- नाशिकमधील इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांना धमकीचा फोन आला आहे. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक दोन गटातील राजकारण धुमसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नाशिकसह जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांच्या निवडणुक प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीत पिंगळे आणि चुंभळे गट आमने सामने असणार आहेत. नाशिक कृषी बाजार समितीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिवसेना शिंदे गट असे चित्र असले तरी पिंगळे गट विरुद्ध चुंभळे गट अशी पारंपरिक लढत होतांना दिसत आहे. महाविकास आघाडीमुळे इगतपुरी मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर हेदेखील पिंगळे गटासोबत प्रचार यंत्रणेत सहभागी झालेले आहेत. त्याचा राग मनात धरून शेतकरी विकास पॅनलचे नेते शिवाजी चुंभळे यांनी आमदार खोसकर यांना मोबाइलवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर चुंभळे यांचे चिरंजीव अजिंक्य चुंभळे यांनीदेखील आमदार खोसकर यांना धमकी दिली आहे. “मतदारसंघात फिरू नको, माझ्या बापाच्या नादी लागू नको, तू अजून आम्हाला ओळखले नाही. आमच्या नादी लागल्यावर काय परिणाम भोगावे लागतील, याचा विचार कर” अशा पद्धतीने वेळोवेळी धमकी दिली जात असल्याचे आमदार खोसकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणावर बोलताना आमदार खोसकर म्हणाले, मला निवडणूक लढवायची नाही. मी शेती करेल. मला अशी जीवे मारण्याची धमकी देत असतील तर त्यांच्या हातून मरण्यापेक्षा मी आत्महत्या करून घेईल असे म्हणत आमदारांना रडू कोसळले. अशा पद्धतीने दादागिरी करणार असतील तर आम्ही काय घरात बसायचं का? यांची हुकूमशाही आमची मुस्कटदाबी करू लागली असल्याची खंत यावेळी आमदार खोसकर यांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणी बोलताना माजी सभापती शिवाजी चुंभळे म्हणाले की, आमदार खोसकर यांनी केलेले आरोपाचे खंडन करीत, तथ्यहीन असल्याचे सांगितले. तसेच माझ्या मुलाने आमदारांना फोन केला होता. जे बोलणं झालं त्याची क्लिप आमच्याकडे असून ती आम्ही पोलीसांना दाखविली व ऐकवली आहे. दरम्यान या प्रकारामुळे नाशिक बाजार समितीच्या निवडणुकीचे राजकारण चांगलेच तापले असून, गालबोट लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!