
मुख्यमंत्री शिंदेचा त्यांच्याच गटातील आमदारासोबत ‘या’ कारणाने वाद
शिंदे गटात भाजपामुळे मिठाचा खडा,शिंदे गटातील धुसफूस वाढली
मुंबई दि १(प्रतिनिधी)- ठाण्यातील मतदारसंघावरून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक अणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वाद झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यात पूर्वेश सरनाईक यांच्या ट्विटमुळे नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.तर प्रताप सरनाईक यांनी मात्र प्रतिक्रिया देण्यात नकार दिला आहे.
ठाण्यातील ओवळा माजिवाडा मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे. प्रताप सरनाईक हे ओवळा माजिवाडा मतदारसंघाचे आमदार आहेत. हा मतदारसंघ प्रताप सरनाईक यांनी भाजपासाठी सोडावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर दबाव टाकायला सुरुवात केल्याने दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे. तसेच मतदार संघ न सोडल्यास पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणाच्या चौकशीचा फार्स आवळण्याच्या हालचाली सुरू करण्याचा इशाराही देण्यात आल्याच्या चर्चा आहेत. सरनाईक आणि शिंदे एकमेकांचे कायमच राजकीय विरोधक राहिले आहेत. पण सरनाईक यांनी शिंदे यांना साथ दिल्याने त्यांच्यात आता सगळं आलबेल असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, दोघांमधील शीतयुद्ध आता नव्याने धुमसू लागले आहे. अर्थात यात तथ्य नसल्याचा दावा शिंदे गटातील नेत्यांकडून करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक झालेले प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. ते सलग तीनवेळा ओवळा- माजीवाडा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. पण भाजपा त्या मतदार संघासाठी शिंदेवर दबाव टाकत असल्यामुळे शिंदे यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.