Latest Marathi News

नदी पुनरुज्जीवनाच्या वृक्ष तोडीवर पुणे महापालिकेचे स्पष्टीकरण

काढण्यात येणारे वृक्ष सुबाभूळ, कुबाभूळ प्रजातीची, अधिक्षक अभियंतांचा व्हिडिओ प्रसारित

पुणे दि ३(प्रतिनिधी)-  पुणे महानगरपालिकेने मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. पुनरुज्जीवनाचे काम करीत असताना नदी लगत असणारी ६ ते ७ हजारांपेक्षा जास्त वृक्ष तोडली जाणार असल्याची सध्या चर्चा समाज माध्यमांमध्ये आहे. मात्र, नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असल्याच्या चर्चेमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागाच्या वतीने एक व्हिडिओ सुद्धा प्रसारित करण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिकेच्या अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांचा हा व्हिडिओ असून त्यामध्ये नदी सुधार प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या वृक्षाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. देशमुख यांचा व्हिडिओही महानगरपालिकेने प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये देशमुख यांनी सांगितले आहे की, ‘नदी सुधार प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार, अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. परंतु प्रत्यक्षात ती वस्तुस्थिती नाही. नदी सुधार प्रकल्पांतर्गत सुरुवातीला दहा किलोमीटरचा नदी काठ विकसित करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी आवश्यक सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये तीन हजार झाडे काढण्यात येणार आहे. पण हे सर्व झाडे झुडूप या प्रकारात येतात,’ असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. ते पुढे म्हणाले, ‘या तीन हजार वृक्षांमध्ये ९६ टक्के झाडे ही सुबाभूळ, कुबाभूळ या प्रजातीमधील आहेत. या वृक्षांची अनियंत्रित वाढ होत असते. नदी सुधार प्रकल्पाच्या कामासाठी जेथे झाडे काढणे आवश्यक आहे, तेथेच ती काढली जाणार आहेत. त्यामध्येही सुबाभूळ आणि कुबाभूळ यांचे प्रमाण जास्त आहे. इतर झाडांची पुर्नरोपण करण्यात येणार आहे. ‘नदी सुधार प्रकल्पासाठी स्थानिक प्रजातीची कोणतेही झाड काढले जाणार नाही,’ असे सांगतानाच देशमुख पुढे म्हणाले की, ‘उलट पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्थानिक प्रजातीची ६० ते ६५ हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. हे सर्व वृक्षारोपण करताना बंगलोर येथील बॉटनीमध्ये अभ्यास असणाऱ्या एका संस्थेची मदत घेतली जाणार आहे.

तज्ज्ञांनी नदीकडेला कुठल्या पद्धतीची झाडे असली पाहिजेत, याचा तांत्रिक अभ्यास केला असून ती झाडे लावली जाणार आहेत. यामध्येही सावली देणारे झाडे, पक्ष्यांसाठी, वन्यप्राण्यासाठी फळे-फुले देणारी झाडे, नदीला पूरक अशी झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. नदी कडेला ही झाडे लावण्याचे नियोजन सुनियोजित पद्धतीने करणार आहोत. जेणेकरून ही झाडे टिकून राहतील.’

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!