
विधानभवनाच्या पाय-यावर सत्ताधारी विरोधक आमदारात हाणामारी
एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी,शिविगाळ केल्याचा आरोप
मुंबई दि २४ (प्रतिनिधी)- पावसाळी अधिवेशनात आज विधीमंडळाच्या पाय-यावर सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये चक्क हाणामारी झाली आहे. एकमेकांविरोधात घोषणा देण्यात आल्याने आमदार आक्रमक झाले होते. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण पहायला मिळाले.
घोषणाबाजीवरून सुरू झालेला वाद हाणामारीपर्यंत येऊन पोहोचला.यावेळी शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा चौथ्या दिवस आहे. विरोधक दररोज ५० खोक्यांवरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत असतात. आज शिंदे गटाने कोरोना काळात घोटाळा केल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली.लवासाचे खोके बारामती ओके,वाझेंचे खोके, मातोश्री ओक्के अशा घोषणा शिंदे गटाकडून देण्यात येत होत्या. यावेळी मिटकरी आणि शिंदे यांच्यात हाणामारी झाली.आई – बहिणीवरुन शिवीगाळ झाल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केला आहे. तर त्यांनी आम्हाला धक्कागुक्की केली नाही आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली अशी कबुली देताना आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत डरपोक नाही अस भरत गोगावले यांनी सांगितले आहे.सत्ताधाऱ्यांना आमच्या घोषणा झोबल्या असा आरोप अजित पवारांनी केला आहे.
महाराष्ट्रात एकीकडे शेतकरी अडचणीत आहे. अनेक प्रश्न आ वासून राज्यासमोर उभे आहेत. असं असताना लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात पाठवलेल्या या प्रतिनिधींकडून अशी कृती निश्चितच लाजिरवाणे असल्याचं बोललं जात आहे.