पक्षाच्या कार्यक्रमातच काँग्रेस नेत्यांची हाणामारी
राहुल गांधीची भारत जोडो यात्रा, नेत्यांची मात्र हात पाय तोडण्याची भाषा
राजस्थान दि १८ (प्रतिनिधी) – राजस्थान काँग्रेसमधील बेबनावसचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले काँग्रेसचे नेते आपापसातच भिडल्याचे दिसून आले. इतर नेते आणि कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण मिटले. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे देखील या कार्यक्रमाला येणार होते. पण नंतर त्यांनी या ठिकाणी येण्याचे टाळले.
जयपूरमध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्यांची महत्त्वाची बैठक होणार होती. या बैठकीला मुख्यमंत्री अशोक गेहलोत, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा, अजय माकन यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वीच काँग्रेस सेवादलाचे नेते अंतर्गत वादातून एकमेकांना भिडले. वादाचे रुपांतर पुढे धक्काबुकीत झाल्याचेही दिसून झाले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या मीडिया कर्मचार्यांनी याचा व्हिडिओ काढला असून सध्या तो तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमुळे लोक राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर निशाणा साधताना दिसत आहेत. राहुल गांधी देश जोडत असतात कार्यकर्ते एकमेकांना तोडत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
आम आदमी पार्टी, राजस्थानच्या वतीने हा व्हिडीओ शेअर करण्यात आहे. तसेच यावरून निशाणा देखील साधण्यात आला आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत काँग्रेस नेते आपापसात भांडत आहेत, आता राजस्थानमधून त्यांची उलटी गिनती सुरू झाल्याचं म्हटलं आहे.