पतीला पाहताच आठ महिन्याच्या गर्भवती महिलेचा मृत्यू
२० दिवसांनी होणार होती प्रसुती, हत्येच्या गुन्ह्याखाली पती तुरुंगात, पल्लवी सोबत तुरंगात काय घडले?
पाटना दि ७(प्रतिनिधी)- बिहारमधील भागलपुरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या आपल्या पतीला भेटायला गेलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे ती महिला ८ महिन्यांची गर्भवती होती. येत्या २७ जूनला तिची प्रसूती होणार होती. पण पतीला भेटल्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेच्या मृत्यूवरुन वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे.
पल्लवी यादव असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.तर गुड्डू यादव असे तिच्या पतीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार भागलपूरच्या घोघा गोविंदपूर येथील गुड्डू यादवचा विवाह घोघा जानिडीह येथील पल्लवी यादवसोबत २ वर्षांपूर्वी झाला होता. त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. गुड्डू यादवचा विनोद यादवशी जमिनीवरुन वाद होता. या प्रकरणी गुड्डूवर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे तो गेल्या आठ महिन्यांपासून भागलपूरच्या विशेष मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. घटनेच्या दिवशी म्हणजे ६ जून रोजी पल्लवी पती गुड्डूला भेटण्यासाठी तुरुंगात पोहोचली. नंबर येताच गुड्डू तिच्या समोर आला मात्र इतक्यात पल्लवी बेशुद्ध पडली. यानंतर तिला तातडीने मायागंज रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. गुड्डूचा भाऊ विक्की यादवने वहिणीच्या मृत्यूला पोलिस प्रशासनाला जबाबदार धरले आहे. पोलिसांनी दुसऱ्या पक्षाकडून पैसे घेऊन माझ्या भावाला तुरुंगात टाकले, जर माझा भाऊ तुरुंगात नसता तर ही परिस्थितीच आली नसती. आमचं संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले नसते. असा आरोप त्याने केला आहे. पल्लवीच्या मृत्यूनंतर कुटुंबीय शवविच्छेदनासाठी सहमत नव्हते. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस संरक्षणात पल्लवीवर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत.
पल्लवीचा गुड्डुबरोबर प्रेमविवाह झाला होता. विशेष म्हणजे पल्लवी गर्भवती असल्यापासून तो जेलमध्ये होता. आता अवघ्या २० दिवसानंतर ती आपल्या बाळाला जन्म देणार होती. पण त्यापूर्वीच तिचा मृत्यु झाला आहे. अद्याप पोलिस प्रशासनाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.गर्भवती पल्लवीच्या मृत्युने गावाने शोक व्यक्त केला आहे.