
‘भाजपात येणाऱ्यांना गुजरातच्या निरमा पावडरने स्वच्छ करतो’
भाजप आमदाराचं वादग्रस्त विधान, विरोधक आक्रमक, भाजप अडचणीत
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- भाजप भ्रष्टाचाराची वॉशिंग मशीन आहे. तिथे गेल्यावर नेत्यांचे सगळे डाग धुऊन जातात, अशी टीका विरोधकांकडून भाजपवर सातत्याने केली जाते. मात्र आता खुद्द भाजपच्याच आमदाराने आमच्याकडे गुजरातहून निरमा पावडर येते, ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही स्वच्छ करून घेतो, असं म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान सरकारी योजनांचे कौतुक करताना रमेश पाटील यांनी भूषण देसाई यांचा विषय काढला. ते म्हणाले, “कोणी तरी म्हणाले भूषण देसाई यांची एमआयडीसीची ४०० कोटींची फाइल आहे म्हणून ते आले. मात्र म्हणून ते आलेले नाहीत तर हे सरकार चांगले काम करते आणि न्याय देते म्हणून ते इथे आले आहेत. आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे आणि ती गुजरातवरून येते. त्यामुळे आमच्याकडे जो माणूस येईल तो स्वच्छ होणार आहे आणि हे खरे आहे. रमेश पाटील यांच्या या वक्तव्यावर अजित पवारांनी टीका केली आहे. ‘महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस बघतो आहे. तो काय चाललंय ते समजतोय. या सगळ्यांच्या उच्चस्तरीय चौकशा झाल्या पाहिजेत, अशाप्रकारे पांघरूण घालून चालणार नाही. याआधी महाराष्ट्रामध्ये असं काही घडत नव्हतं,’ असं अजित पवार म्हणाले आहेत.
भाजपचे विधान परिषदेतील आमदार रमेश पाटील यांनी केलेल्या विधानाने राजकारण तापण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर सुरू असलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांवरून विरोधकांकडून मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं जात असताना रमेश पाटील यांनी केलेल्या विधानामुळे भाजप चांगलाच कोंडीत सापडला आहे.