निवडणूकीचा अर्ज भरण्यासाठी आणली १० हजारांची चिल्लर
चिंचवडमध्ये गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, रक्कम मोजताना अधिकाऱ्यांची दमछाक
चिंचवड दि ७(प्रतिनिधी)- चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे सगळ्यांकडून अर्ज दाखल करण्याची लगबग सुरु होती. पण यावेळी निवडणुक अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. कारण एका उमेदवाराने चक्क अर्ज भरायला येताना १० हजार रुपयांची चिल्लर आणत अर्ज भरला आहे. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हा चित्रपट अनेकांनी पाहिला आहे. या चित्रपटात मकरंद अनासपुरे निवडणूक अर्ज भरण्यासाठी चिल्लर घेऊन आला होता. नेमका तसाच प्रकार आज चिंचवडमध्ये पहायला मिळाला. रयत विद्यार्थी परिषद संघटनेचे राजू काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी डिपॉझिट भरण्यासाठी १० हजारांची चिल्लर आणली होती. यामध्ये १, २, ५ आणि १० रूपयांची नाणी होती. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांचा चांगलाच खोळंबा झाला.तब्बल दहा हजार रुपयांची चिल्लर अधिकाऱ्यांना मोजावी लागल्याने त्यांचेही धाबे दणाणले. पैसे मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना तब्बल एक तास लागला. त्यामध्येच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अर्ज स्वीकारण्याची घाई सुरू असल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांना पैसे मोजताना घाम फुटला होता. तरुणांनी राजकारणामध्ये सक्रिय झाले पाहिजे. लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. ही जमा केलेली रक्कम मी साठवलेली होती अस काळे यांनी सांगितले आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून नाना उर्फ विठ्ठल काटे आणि ठाकरे गटाचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण आज चर्चा मात्र राजू काळे यांच्या चिल्लरची होताना दिसत आहे.