‘व्हॉटसअॅपवर मेसेज पाठवल्याची तक्रार आली तर सोडणार नाही’
अजितदादांनी कार्यकर्त्यांना भरला दम, अजितदादांच्या त्या चुकीने हास्याचा फवारा
बारामती दि २७(प्रतिनिधी)- विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भाषण म्हटले की हास्याचे फवारे व आपल्या पक्षातील नेत्यांसह विरोधकांना चिमटे हे समीकरण ठरलेलेच असते. त्यांचा ग्रामीण लहेजा भाषणाला वेगळीच रंगत आणतो. आपल्या बिनधास्त भाषणाच्या शैलीसाठी पवार प्रसिद्ध आहेत. आज त्याच्याच अनुभव बारामतीत आला. यावेळी त्यांच्या भाषणात गमतीशीर प्रसंग अनुभवायला मिळाला.
बारामतीतील राष्ट्रवादी भवनात आयोजित मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाषणादरम्यान अचानकच ‘अध्यक्ष महोदय…’ असे म्हटल्यानंतर सभागृहात प्रचंड हशा पिकला. आपली चूक लक्षात आल्यावर अजित पवारांनाही हसू आवरले नाही. सवयीचा परिणाम म्हणत अजितदादा देखील मनमुराद हसले. यावेळी आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांना त्यांनी दम दिला. ते म्हणाले बूथ कमिटी कार्यकर्त्यांनी २५ कुटुंबासोबत संपर्क साधताना दुसराच संपर्क साधू नका, व्हॉटसअॅपवर मेसेज पाठवू नका. नाहीतर ओळख झाली म्हणून तुम्ही तसे मेसेज पाठवाल त्यामुळे पक्षाचेच नुकसान होईल.जर माझ्याकडे अशा तक्रारी आल्या तर मी सोडणार नाही असा दमच अजितदादांनी यावेळी दिला. आम्ही बारामतीत नसलो की काहीजण अजित पवार, सुप्रिया सुळे समजतात, असे काहींनी मला सांगितले आहे. काही जण तर पनवेलला जातात असे देखील माझ्या कानावर आले आहे.या संबंधीच्या चिठ्ठ्या माझ्याकडे आल्या आहेत. पक्ष संघटनेसाठी वेळ काढा अन्यथा वेगळा विचार करावा लागेल, असा सज्जड इशाराही अजितदादांनी यावेळी दिला. त्यांच्या या इशा-याची जोरदार चर्चा रंगली होती.
बारामती तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती, कृषी उत्पन्न बाजार समिती निरा-पुरंदर आणि बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या सभेत बोलताना अजित पवार यांनी सरकारवर कडाडून टीका केली.