पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर गेलेल्या काँग्रेस खासदाराची स्टंटबाजी;कारच्या बोनेटवर बसून बनवली रील, व्हिडिओ समोर
मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होत आहे. त्यातच भंडारा जिल्ह्यातील तुमसरच्या सीमांत भागातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती असून, शेकडो हेक्टर शेतशिवार जलमग्न झाले. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मात्र, या पूर पाहणीचा दौरा खासदार प्रशांत पडोळे यांनी बुधवारी (दि. ११) एका स्थानिक काँग्रेस नेत्याच्या आग्रहास्तव केला. पण हा दौरा चांगलाच चर्चेत आला. कारण, या दौऱ्यात कारच्या बोनेटवर बसून पुराच्या पाण्यातूनच स्टंट केल्याचा प्रकार समोर आला आहे.
खासदार प्रशांत पडोळे हे पूर पाहणीचा दौरा करत होते. मात्र, त्याचवेळी चारचाकीच्या बोनेटवर बसून पाण्याखाली आलेल्या रत्यावरून स्टंट करतानाचा व्हिडिओ तुमसर तालुक्यात चांगलाच व्हायरल झाला आहे. आधीच शेतकरी आर्थिक संकटात अडकला आहे. कर्जबाजारी होऊन हलक्या धानाकरिता शेतकऱ्याने मेहनत केली. परंतु, सलग दुसऱ्यांदा सिहोरा भागात पूर आला असताना खासदार महोदयांनी ही अशाप्रकारे स्टंटबाजी केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या व्हिडीओमुळे एका जबाबदार जनप्रतिनिधीच्या गांभीर्यावर पूरबाधित शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
येथे सामान्य वाहतुकदारांनी नियम मोडले तर पोलिस तत्काळ कारवाई करते. मात्र, नंबर नसलेल्या चारचाकी गाडीवर बसून आपला जीव धोक्यात घालणाऱ्या खासदारांवर पोलिस कारवाई करतील काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. खासदार पडोळे यांनी लाइव्ह चालणाऱ्या व्हिडीओमध्ये केलेल्या कृत्यामुळे विरोधकांना संधी मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येणाऱ्या दिवसात खासदारांवर विरोधक आक्रमक होऊन त्याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत घेणार असल्याचे समजून येते.