
मुंबई दि २(प्रतिनिधी)-शिवसेना आणि दसरा मेळावा हे एक अतूट नाते आहे.बाळासाहेबांनी सुरु केलेला दसरा मेळावा आजपर्यंत शिवाजी पार्कवर होत आलेला आहे. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडली आहे. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानात नेमका कोण मेळावा घेणार, यावरुन उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात चढाओढ सुरु झाली आहे. दसरा मेळाव्याला परवानगी मिळण्यासाठी शिवसेनेने मुंबई महापालिकेत अर्ज दाखल केला आहे. मात्र, अद्याप त्यांना परवानगी मिळालेली नाही. त्यातच आता शिंदे गटाकडूनही परवानगीसाठी महापालिकेत अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे परवानगी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
शिंदे गटाकडून अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना आमदार सदा सारवणकर म्हणाले की, “मी शिवसेनेचा आमदार आहे. गेली १७ वर्षे मी मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी अर्ज करत आहे. परवानगी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मेळाव्याला मार्गदर्शन करतील. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचे विचार या मेळाव्याच्या माध्यमातून दिले जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेनेही शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे मनीषा कायंदे यांनी शिंदे गटावर टिका करताना म्हणाल्या की, “एकच नेता, एकच विचार, एकच मैदान हे ५० वर्षे गाजत आलं आहे. तुमच्या शाखेजवळ आमची शाखा, तुमच्या मेळाव्यासमोर आमचा मेळावा, असा थिल्लरपणा सुरु आहे. हे कोणाच्या दबावाखाली सुरु आहे, लक्षात येत आहे. दिल्लीश्वरांकडून यांना ही सुचना दिली जाते, त्याप्रमाणे हे वागत आहे. आपल्या पक्षाशी गद्दारी करुन, उद्धव ठाकरेंना त्रास द्यायचा आहे. या एकमेव हेतूनं हे सर्व सुरु आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार. असली कोण नकली कोण लोकांनी ओळखलं आहे,” असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.
दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या सभेला राज्यभरातून शिवसैनिक हजेरी लावत असतात. शिवसेनेची आगामी दिशा या मेळाव्यसतून ठरायची पण मुंबई महापालिका निवडणूका लक्षात घेऊन शिंदे गट आणि मनसे एकत्रित मेळाव्या घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्याआधी वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.