
नाशिक दि २ (प्रतिनिधी)- नाशिकमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. सिन्नर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर, नदीकाठच्या अनेक वाड्या-वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं आहे. त्यातच सुटकेचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
जोरदार पावसामुळे नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहे. अवघ्या १० ते१५ मिनिटात पावसाने धुमाकूळ घातल्याने अनेक नागरिक बेपत्ता झाले असण्याची शक्यता आहे.त्यामुळे मदतकार्य करण्यासाठी शासकीय यंत्रणा रात्रीच त्या भागात दाखल झाल्या आहेत.आता सिन्नरमधील नागरिकांचं रेस्क्यू करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. नागरिकांच्या बचावासाठी जेसीबीची मदत घेतली जात आहे. यात अनेक नागरिकांना जेसीबीवर बसवून पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात येत आहे.आत्तापर्यंत जेसीबीच्या साहाय्याने ३३ नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. अजूनही काही भागात बचावकार्य चालू आहे.
नाशिकमध्ये अचानक झालेल्या पावसाने सगळ्यांचीच धावपळ उडाली होती. त्याचबरोबर सिन्नर आणि परिसरात विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली होती. सप्तशृंगी गडावर देखील ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने नुकसान झाले आहे.