मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलं आहे. त्यांनी सरकारला 13 ऑगस्ट पर्यंतचा वेळ दिला आहे. उपोषण स्थगित करण्याचा निर्णय जाहीर करताना त्यांनी भाजपा, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यावर पातळी सोडून टीका केली.“देवेंद्र फडणवीस हे प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना समोर करून काड्या करत आहेत” असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. मनोज जरांगे पाटील यांची प्रवीण दरेकरांबद्दल बोलताना जीभ घसरली. “दरेकरने कपाळावर कुंकू लावले तर, अतिशय सुंदर दिसेल, सखू सारखा दिसेल” अशी पातळी सोडून टीका केली. “सरकारकडून कोणी आले नाही, कारण सरकारकडे मंत्री उरले नाहीत. अनेक जण आले, आता पुन्हा कोणत्या तोंडाने जायचे हा विषय असेल. समाजाच्या दबावामुळे मी सलाईन घेतले” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील आपल्या अटक वॉरंट बद्दल सुद्धा बोलले. “शंभू राजे नाट्य दाखवण्याचा कार्यक्रम होता. त्यामध्ये नुकसान झाले, काहींनी पैसे चोरले. गल्ला माझ्याकडे नव्हता. कमी पडले तर आम्ही इकडून तिकडे आणून द्यायचो. प्रामाणिकपणे केलेला सांस्कृतिक कार्यक्रम होता. नुकसान झाले, आम्ही नुकसान वाटून घेतले. आम्ही आमच्याकडचे दिले. पण एकाने दिले नाहीत. तेही आमच्याच गळ्यात घातले. अशी केस आहे. हे प्रकरण 12 -13 वर्षांपासून का काढले नाही?” असा सवाल मनोज जरांगेंनी विचारला.“पुन्हा अटक वॉरंट का काढले?. न्याय, गृह विभाग फडवणीस यांच्याकडे आहे. हा देवेंद्र फडणवीस यांनी रचलेला डाव आहे. न्यायाधीश हे फडवणीस यांचे नातेवाईक आहेत. मला जेल मध्ये टाकून जीवे मारले जाऊ शकते. मी कुठेच अडकत नाही, म्हणून हा कट आहे. मी पैसे दिले होते, त्या मॅटर मध्ये माझा चेक नाही. आम्ही सन्मान करतो म्हणून हुकूमशाही करता का?. नाटकाचे पैसे देण्यासाठी, मी घर विकून पैसे देतो, मी गायरानात राहील” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“या अटक वॉरंट प्रकरणात, उद्धव ठाकरे यांचा हात असू शकतो. नाटकवाला त्यांच्या जवळचा आहे” असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. “अटक करून आता टाकायचा फडणवीस यांचा अट्टहास का?. ईडीचे कितीतरी वॉरंट कॅन्सल झाले आहेत आणि त्यामध्ये छगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक यांचे नाव आहे. बाकीचे देव बाप्पा चांगले मग हे देव बाप्पा असे कसे?मला वॉरंट आले तरी मी जात नसतो, कोर्टाने पण फडवणीस यांचे ऐकणे सोडावे” अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.“दरेकर मराठा आहेत का हे शोधावे लागेल. मी काही झुकत नाही, जेल मध्ये जायला तयार आहे, टाका आता जेलमध्ये. मी उद्या जेलमध्ये जायला तयार आहे. देवेंद्र फडणवीस यांना कुठेच मी गठलो नाही, भाजपचे सरकार येणार नाही. मला आता टाकून फडवणीस यांना निवडणूक काढायची आहे. मी आत गेलो तर भाजपची एकही सीट आली नाही पाहिजे, देवेंद्र फडणवीस यांचा बिमोड करा. भाजप सोबत मराठ्यांनी राहू नका. मी मेलो तरी, माझ्या आत्म्याला शांती तेव्हाच मिळेल, जेव्हा हे सर्व पडतील. वेळ पडली तर आम्ही ओबीसीचे निवडून आणू. उपोषण संपल्यानंतर पुन्हा राज्य दौरा सुरू करणार, घरी बसायची वेळ नाही.7 ते 13 ऑगस्ट दौरा सुरू करणार” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.