Latest Marathi News
Ganesh J GIF

‘अरे पीकविमा मंजूर केला आहे, पण भेटणार कधी बाबा’

कृषीमंत्री धनंजय मुंडेवर जोरदार टिका, शेतकरी पुत्र असल्याचे सांगणारे दहा ते वीस कोटींच्या गाडीत फिरतात म्हणत टिकास्त्र

बीड दि १४(प्रतिनिधी)- सध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्याची मागणी होत आहे. पण आता शेतकऱ्यांच्या मदतीवरून कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा मुंडे शर्मा यांनी टिका केली आहे. पीकविम्यासह मतदारसंघातील विकासकामांवरून मंत्री मुंडेंवर निशाणा साधला आहे.

करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील वाद महाराष्ट्राला नवीन नाही. करुणा शर्मा- मुंडे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे मंत्री धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली आहे. जेव्हापासून धनंजय मुंडे कृषिमंत्री झाले आहेत. तेव्हापासून काही माध्यमांमध्ये एकच बातमी पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांनी पीक विमा मंजूर केला. पण अरे पीक विमा मंजूर केला आम्हाला माहित आहे. पण भेटणार कधी बाबा, तुझे पाच वर्ष संपल्यावर विम्याची रक्कम मिळणार का?, असा थेट सवाल करुणा मुंडे यांनी उपस्थित केला आहे. गळ्यात गमछा टाकून उसतोड कामगारांचे कैवारी असल्याचे दाखवतात. स्वतःला शेतकरी पुत्र असल्याचे सांगून देखावा करतात; पण शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत माहीत आहे का?  बीड  जिल्ह्यात खूप वाईट परिस्थिती आहे. महिलांसाठी शहरात शौचालय नाही. गावात मोठ-मोठे खड्डे असल्याने अनेकांचे हात-पाय तुटतात. उसतोड कामगारांची खूप वाईट परिस्थिती आहे. असे असतांना आज हे लोकं दहा ते वीस कोटींच्या गाडीत फिरतात. काही लोकं स्वतःवर जेसीबीतून फुल उधळून घेतात. यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिले नाही. त्यामुळे हे आमदार, खासदार आणि मंत्री आपले नोकर असल्याचे जनतेने समजून घेतलं पाहिजे, असेही त्या म्हणाल्या आहेत. तसेच धनंजय मुंडे यांनी नुसत्या घोषणा करण्यापेक्षा काम करून दाखवावे. हे लोकं फक्त नारळच फोडतात. मात्र, विकासकामे काही होत नाहीत. आम्ही हे केलं ते केलं असे सांगून फक्त खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आता धनंजय मुंडे किंवा अजित पवार गट यावर काय प्रतिक्रिया देणार हे पहावे लागेल.

परळीतून धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचीदेखील बोलले जात आहेत. दरम्यान करुणा शर्मा हे नाव महाराष्ट्रात २०२१ मध्ये चर्चेत आले होते. मुंबईतील एका महिलेने धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून करुणा शर्मा यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल माहिती उघड केली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!