
‘उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत जाऊन अमित शहांसमोर रडले’
भाजपा अजित पवारांना आठवणार?, अजित पवार गटाला भाजपच्या तिकिटावर लढावे लागणार? भेटीबाबत धक्कादायक खुलासा
मुंबई दि १४(प्रतिनिधी) – महायुतीत अजित पवार सामील होऊन आता चार महिन्याचा कालावधी लोटला आहे. पण अजित पवार यांना नेहमी हवा तसा मिळणारा फ्री हँड या सरकारमध्ये मिळू शकलेला नाही. त्यामुळे अजित पवार गटात अस्वस्था वाढली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली होती. पण आता त्या भेटीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
अजित पवार नाराज असल्याच्या चर्चेबाबत विरोधी पक्षनेते, कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज कडवट टीका केली आहे. तसेच अमित शहा यांच्या सोबत झालेल्या भेटीबाबत मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले ‘दिल्लीत जाऊन अजित पवार यांनी अमित शहा यांच्याकडे तक्रार केली. आता असं सांगू नका की तक्रार करता करता ते तिथे रडले. तक्रारी पुरताच दादांना मर्यादित ठेवा. आता रडण्याची स्थिती अजित पवारांवर आली असेल. कारण भारतीय जनता पक्षामध्ये जाणाऱ्यांना रडवून-रडवून सडवतात देखील. त्यामुळे रडण्याची आणि सडण्याची वेळ अजित पवारांवर आली असावी’ असं विजय वडेट्टीवार म्हणाले. तसेच ‘अजित पवार कधी खूश राहिले, ते नेहमीच नाराज असतात. त्यांच्या मनाप्रमाणे झाले, तर ते खूश होतात. मनाविरुद्ध झाले, तर नाराज. ‘हम करे सो कायदा’अशा पद्धतीने त्यांची भूमिका असते. आता तीन पक्षांच्या सरकारमध्ये त्यांना वाटतं की, निधी मिळत नाही. अरे तिजोरीची चावीच तुमच्याकडे आहे, मग तुम्ही दुसऱ्यांकडे तक्रार का करता? आता तुमची धमक दाखवा.’ असे आव्हान देखील वडेट्टीवार यांनी दिले आहे. पुढच्या वेळेस अजित पवारांना भाजपच्या तिकिटावरच लढावं लागेल असं मला एकंदरीत दिसते आहे. कमळावर लढल्याशिवाय त्यांना पर्याय नाही असे देखील ते म्हणाले आहेत. वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
शिंदे गटाला अधिक विकास निधी दिला जातो तर अजित पवार गटाला तुलनेनं कमी विकास निधी दिला जात असल्याची तक्रार अजित पवार गटाने केली आहे. याबाबत त्यांनी अमित शहांची भेट घेतली होती. शिंदे गटामुळे आमच्या अडचणी वाढत आहेत, अशी तक्रारही अजित पवार यांनी अमित शहांकडे केल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवार कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.