देहरादून- अंगाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एका डॉक्टरने पत्नीला विषारी इंजेक्शन टोचत तिची हत्या केली. त्यानंतर त्याच इंजेक्शनने आत्महत्या केली.
डॉक्टरने आपल्या मुलालाही इंजेक्शन टोचलं. पण त्यात विष नव्हतं. रुग्णालयातून नेहमीप्रमाणे घरी आल्यानंतर डॉक्टर आपल्या मुलासोबत ल्युडो खेळला. या गेममध्ये डॉक्टर जिंकला. त्यानंतर डॉक्टरने बॅगेतून एक इंजेक्शन काढलं आणि ते मुलाला दाखवलं आणि आपण कायमचे निघून जाणार असल्याचं सांगितलं. वडिलांच्या मनात काय चाललंय याचा अंदाज कदाचित त्या मुलाला आला असावा. मुलाने पहिल्यांदा आपल्याला इंजेक्शन टोचा असं वडिलांकडे हट्ट धरला.
काय आहे नेमकी घटना?
उत्तराखंडमधल्या देहरादूनमधली ही धक्कादायक घटना आहे. डॉ. इंद्रेश शर्मा असं या डॉक्टरचं नाव असून ते उधम सिंह नगर जिल्ह्यातील काशिपूर इथल्या एका खासगी रुग्णालयात सेवा देत होते. दहा ते बारा वर्षांपूर्वी डॉ. इंद्रेश शर्मा, मुलगी देवांशी आणि मुलगा इशान याच्याबरोबर काशिपूरमध्ये राहायला आले. डॉ. इंद्रेश शर्मा यांच्या पत्नी कॅन्सर पीडित होत्या आणि गेल्या सहा वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. पत्नीच्या उपचारात त्यांचा बराच पैसा खर्च झाला होता.
पत्नीच्या आजारपणाने खचले
पत्नीच्या उपचारासाठी डॉ. इंद्रेश शर्मा यांनी अनेक जणांकडून कर्ज घेतलं होतं. अनेकवेळा त्यांनी पत्नीला आपलं रक्त दिलं होतं, त्यामुळे त्यांची प्रकृतीही ढासळली होती. २०२० मध्ये आलेल्या कोरोना महामारीने ते आणखीनच खचले. आर्थिक परिस्थीत अधिकच ढासळल्याने २०२० मध्ये त्यांना मुलांच शिक्षणही बंद करावं लागलं. मुलाला घरच्या परिस्थितीबद्दल माहित असल्याने त्यानेही वडिलांकडे शाळेत जाण्याचा हट्ट धरला नाही. पण पत्नीचं आजारपण, मुलांचं थांबलेलं शिक्षण यामुळे डॉ. इंद्रेश शर्मा नैराश्यात गेले.
उचलं टोकाचं पाऊल
डॉ. इंद्रेश शर्मा यांचा मुलगा इशान याने दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे वडिल रुग्णालयातून घरी आले. काही वेळ आराम केल्यानंतर सर्वजण एकत्र जेवले. त्यानंतर वडिल आपल्याबरोबर ल्युडोही खेळले. पण थोड्यावेळाने त्याने एक इंजेक्शन दाखवत हे सर्वांना टोचायचं असल्याचं सांगितलं. त्यांनी आईला पहिलं विषारी इंजेक्शन दिलं. त्यानंतर स्वत: ला टोचलं, पण मला त्यांनी दुसरं इंजेक्शन टोचलं, ज्यात विष नव्हतं, तर केवळ गुंगीचं इंजेक्शन होतं.
सकाळी उठल्यावर इशानने आईला उठवण्याचा प्रयत्न केला. पण ती काही केल्या उठत नव्हती, त्यानंतर वडिलांनाही उठवलं, पण त्यांनीही प्रतिसाद दिला नाही. अखेर इशानने नातेवाईक आणि शेजारच्यांना याची माहिती दिली. या घटनेनं सर्वांनाच मोठा धक्का बसला. मुलगी देवांशी हिचं काही दिवसांपूर्वीच लग्न झालं. भाऊ इशान कडून आई-वडिलांच्या निधनाची बातमी कळताच देवांशी पूरती कोसळली. याप्रकरणी काशिपूर पोलिसांना घटनास्थळावरुन इंजेक्शन आणि सुसाइड नोट सापडली आहे. यात डॉ. इंद्रेश शर्मा यांनी आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदारी धरून नये असं लिहिलं होतं.